Monday, April 29, 2024
Homeनंदुरबारघरकुल अनुदान घोटाळा : आधारकार्डच नसतांना घरकुलाचा लाभ दिलाच कसा?

घरकुल अनुदान घोटाळा : आधारकार्डच नसतांना घरकुलाचा लाभ दिलाच कसा?

नंदुरबार | दि.१६| प्रतिनिधी NANDURBAR

आधार कार्ड ही प्रत्येक भारतीयाची विशेष ओळख आहे. आधारकार्डशिवाय कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही किंवा बँकेचे खातेदेखील उघडले जात नाही. मात्र, असे असतांना ज्या लाभार्थ्याने आजपर्यंत आधारकार्डच काढलेले नाही अशा व्यक्तीचे बोगस आधारकार्ड बनवून दुसर्‍याच व्यक्तींकडून घरकुलाचे अनुदान हडप करण्यात आले आहे. संबंधीत लाभार्थ्याने पंधरा दिवसांपुर्वी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी आधारकार्ड बनविण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अद्यापपर्यंत त्याचे आधारकार्ड तयार झालेले नाही. तरीही त्याच्या नावावर घरकुलाचा लाभ दिला गेलाच कसा असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. एरव्ही बँकांकडून खातेदारांना वारंवार केवायसी करण्याच्या सुचना देवून आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो मागितले जातात. मग मांडवी येथील सेंट्रल बँकेच्या संबंधीत यंत्रणेने या लाभार्थ्यांची केवायसी केली किंवा कसे याबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisement -

उमराणी बु.ता.धडगाव येथे प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल न बांधता लाभार्थ्याच्या नावाने दुसर्‍याच व्यक्तीकडून अनुदान हडप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घरकुल अनुदान घोटाळयात मोठी साखळी कार्यरत असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.

आधार कार्ड ही प्रत्येक भारतीयाची एक विशेष ओळख आहे. प्रत्येक ठिकाणी या आधार नंबर अनिवार्य करण्यात आला आहे. त्याशिवाय कोणत्याही शासकीय योजनाच काय पण बँकेचे खातेदेखील उघडले जात नाही.

अलिकडच्या काळात आधारकार्डला पॅनकार्डही जोडण्यात आले आहे. त्यामुळे आधार क्रमांकावरुन संबंधीत खातेदाराची पूर्ण माहिती बँकांकडे अथवा संबंधीत शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध असते.

असे असतांना उमराणी बु. येथील रमेश सोन्या ठाकरे या लाभार्थ्याचे मांडवी ता.धडगाव येथील सेंट्रल बँकेत बनावट आधारकार्ड सादर करुन एकाच आधार नंबरवर दोन खाते उघडण्यात आले आहेत. मुळात रमेश ठाकरे याच्याकडे आधारकार्डच नाही.

दि.३१ ऑक्टोबर रोजी त्याने प्रथमच आधार कार्ड बनविण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अद्याप त्याच्याकडे आधार कार्ड आलेले नाही. तरीही त्याला घरकुल योजनेचा कागदोपत्री लाभ मिळालेला दाखवून त्याच्या बनावट बँक खात्यात घरकुलाचे अनुदानही वर्ग करण्यात आले असून ते दुसर्‍या बनावट खात्यात वर्गही करण्यात आले आहे.

याशिवाय त्याच्याकडे रेशनकार्डही नाही. त्याच्या वडीलांच्या रेशनकार्डमध्ये त्याचे नाव आहे. त्यामुळे त्याच्या बँकेचे खाते कोणी, कसे उघडले हे त्यांना माहित नाही. तसेच धडगाव तालुक्यातील इतरही कोणत्या बँकेत त्यांनी कधीच खाते उघडलेले नाही.

त्यांच्याकडे कोणतेही जॉबकार्ड नसून त्याचा अर्ज देखील त्यांनी दि.२७ ऑक्टोबर २०२२ रोजी केला आहे. त्यामुळे यांनी आजपावेतो घरकुल योजनेमधून कोणत्याही प्रकारचा लाभ घेतलेला नाही.

एरव्ही, खातेदारांनी काही दिवस बँकेत काहीच व्यवहार केला नाही तर बँकांकडून त्यांचे खाते इनऍक्टीव केले जाते किंवा बंद केले जाते. खातेदारांना खाते ऍक्टीव्ह करण्यासाठी वारंवर केवायसी करण्यासाठी बँकांकडून आधार कार्ड, पॅनकार्डची प्रत, फोटो मागितले जातात.

त्यानंतर खाते सुरळीत सुरु असते. मग मांडवी येथील सेंट्रल बँकेच्या यंत्रणेने रमेश ठाकरे यांच्यासह इतर सातही जणांचे खाते कोणती कागदपत्रे पाहून उघडली? खाते उघडतांना आधारकार्ड तपासला की नाही? केवायसी करतांना फोटो का तपासला नाही?

असे अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे बँकेचे बनावट खाते उघडून देणार्‍यांचीही टोळी सक्रीय राहण्याची शक्यता यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. बनावट कागदपत्रे सादर करुन लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेवून घरकुल अनुदान हडप करणार्‍या या टोळीचा पर्दाफाश होण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या