समिती बैठकीनंतरच घंटागाडी निविदा निर्णय

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कोटीच्या कोटी उड्डाणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या महापालिकेच्या 354 कोटींच्या नवीन घंटागाडीची निविदा Ghanta Gadi Tender प्रक्रियेत सहभागी झालेल्या 11 ठेकेदार कंपन्यांच्या कागदपत्रांची पडताळणी घनकचरा विभागाने solid waste department पूर्ण केली आहे. सुरत महापालिकेत कागदपत्रांच्या पडताळणीसाठी गेलेले घनकचरा विभागाचे पथक माघारी परतले आहे. सहभागी तीनही कंपन्यांनी अनुभवाचे सादर केलेले कागदपत्र बनावट नसल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे आता निविदा उघडण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी याबाबत निविदा समितीच्या बैठकींनंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

महापालिकेतील NMC ठेके कोटीच्या कोटी उड्डाणामुळे वादात असतांनाच,घनकचरा विभागाने नवीन घंटागाडीचा ठेका 176 कोटींवरून 354 कोटींवर नेऊन ठेवला आहे. विशिष्ट मक्तेदारांच्या सहभागासाठी निविदा अटीशर्तींत करण्यात आलेले बदल आणि अधिकार्‍यांच्या संगनमताने मक्तेदारांकडून केली जाणारी रिंग यामुळे घंटागाडीचा हा नविन ठेका संशयास्पद बनला आहे.

सत्तारुढ भाजपच्या दबावामुळे वादानंतरही घंटागाडीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, सहा विभागांतील ठेक्यांसाठी विविध 11 मक्तेदारांनी सहभाग घेतला आहे. सिडको विभागासाठी 6, नाशिक पश्चिम 4, नाशिक पूर्व 3 प्राप्त झाल्या होत्या तर सातपूर, पंचवटी व नाशिकरोड विभागांसाठी पहिल्या टप्प्यात पुरेशा निविदा प्राप्त न झाल्याने त्या सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

नाशिकरोडला दुसर्‍यांदा मुदतवाढ दिल्यानंतर तीन, तर सातपूर व पंचवटी विभागांसाठी निविदा सादर करण्यासाठी तिसर्‍यांदा मुदतवाढ दिल्यानंतर अनुक्रमे तीन व एक निविदा प्राप्त झाली आहे. पंचवटी विभागाकरीता एकच निविदा प्राप्त झाली असल्याने ही निविदा उघडायची किंवा नाही याचा निर्णय सर्वस्वी आयुक्त कैलास जाधव यांच्यावरच अवलंबून आहे. तीन मक्तेदारांनी चार विभागांसाठी निविदा भरताना सुरत महापालिकेत काम केल्याच्या अनुभवाचा दाखला जोडला आहे.

मात्र, या अनुभवाच्या दाखल्यावर अन्य काही मक्तेदारांनी आक्षेप घेतल्यानंतर सर्वच मक्तेदारांच्या कागदपत्रांची उलटतपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.त्यामुळे घनकचरा विभागाकडून या कागदपत्रांची तपासणी सुरू केली होती.यातील तीन कंपन्यांनी सुरत महापालिकेचे कागदपत्र सादर केले होते.त्यामुळे घनकचरा विभागाचे प्रमुख डॉ.आवेश पलोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुरत महापालिकेत कागदपत्रांच्या तपासणीसाठी धाव घेतली होती.यावेळी संबधित कागदपत्राची पडताळणी केली असता,या तीन मक्तेदार कंपन्यांनी सादर केलेले कागदपत्र खरे असल्याचे समोर आले.त्यानंतर हे पथक नाशिकला परतले असून आता संबधित माहिती ही निविदा समिती बैठकीपुढे सादर केली जाणार आहे. त्यामुळे निविदा उघडण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *