Sunday, April 28, 2024
Homeनगरनाला खोलीकरणात तीन मीटरची अट घालणारा शासन निर्णय बदलणे गरजेचे

नाला खोलीकरणात तीन मीटरची अट घालणारा शासन निर्णय बदलणे गरजेचे

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

जलसंधारणाचे काम करीत असताना नाला खोलीकरणात तीन मीटर (दहा फूट) पेक्षा जास्त खोदू नये असा शासन निर्णय आहे. परंतु जमिनीपासून तीन मीटर नाला खोल केला तरी पावसाळ्यात बंधारा पूर्ण भरला तरी एक मीटर उंचीचेच पाणी मिळते. कारण बंधार्‍याचे बांधकाम जमिनीपेक्षा एक मीटर खाली असते व एक मीटर पाण्याची वाफ होते. त्यामुळे भरपूर पाउस पडूनही टंचाई कायम राहील. यासाठी 3 मीटर खोलीची अट असलेल्या शासन निर्णयात बदल करून 6 मीटर खोलीची परवानगी देण्याची गरज असल्याचे मत जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्नचे जनक निवृत्त भूवैज्ञानिक जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

जलसंधारण कामातील अडीअडचणी बाबत दै.सार्वमतशी बोलताना श्री.खानापूरकर पुढे म्हणाले, आजकाल पाऊस पावसाळयात सुद्धा रोज पडत नाही ही वस्तुस्थिती आहे. पाऊस सरासरी इतकाच पडतो, पण कमी दिवसात पडतो. त्यामुळे एकाच दिवशी 200 ते 250 मि.मि. पाऊस काही तासातच पडतो व लगेचच वाहून जातो. तसेच त्याच दिवशी हा 20 वर्षात पडणार्‍या पावसाचा अभ्यास केल्यास असे लक्षात येईल की दरवर्षी सारखाच पाऊस पडत नाही. सध्या तर असे झाले आहे की सलग 2 वर्षे एकतर पाऊस खूप कमी पडतो किंवा पडतच नाही.

कधी 300 मि.मि. तर कधी 1100 मिलिमीटर पडतो. आता झाले असे की खूप पाऊस कमी वेळात पडला आणि लगेचच वाहून गेला म्हणून पाणी टंचाई व पाऊस खूपच कमी पडला म्हणूनही पाणी टंचाई. पाणी टंचाईवर कायमची मात करावयाची झाल्यास जेंव्हा खूप जास्त पाउस पडतो तेंव्हाच तो अडवला व जिरवला पाहिजे. इतकेच नाही तर सलग 2 वर्ष पाउस पडत नसल्यामुळे 3 वर्षासाठी शेतीला व पिण्यासाठी लागणारे पाणी अडविणे आवश्यक झाले आहे. पावसाचे पाणी आपण फक्त नाल्यातच अडवू शकतो पण जंगल कटाईमुळे नाले उथळ व अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहेत.

इतके 3 वर्षासाठी लागणारे पाणी अडवायचे झाल्यास हे उथळ व निरुंद झालेले नाले उगमापासूनच खूप रूंद म्हणजे अंदाजे 100 फूट व खूप खोल म्हणजेच किमान 30 फूट खोल करावे लागतील. यात एक अडचण आहे ती अशी की शासन निर्णय म्हणतो की जमिनीपासून नाल्याची खोली 10 फूटापेक्षा जास्त नको. 3 मीटर जरी नाला खोल केला तरी पावसाळ्यात बंधारा पूर्ण भरला तरी पाणी मिळते 1 मीटर उंचीचेच कारण बंधा-याचे बांधकाम जमिनीपेक्षा 1 मीटर खाली असते व 1 मीटर पाण्याची वाफ होते. शासन निर्णयात आवश्यक ते बदल त्वरित न केल्यास भरपूर पाऊस पडूनही टंचाई कायम राहील. याबाबत सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून राहण्यासाठी नाला किमान 6 मीटर खोलीकरण आवश्यक आहे. अशा प्रकारचे काम धुळे जिल्हयातील शिरपूर तालुक्यातील 70 गावात झालेले आहे. तेथे आता एखाद्या वर्षी पाऊस नाही पडला तरी शेतकरी तिसरे पीक घेतात. तालुक्यात टँकर अजिबात लागत नाहीत. पाण्यासाठी आत्महत्या नाहीत व शेतकरी दुसरे किंवा तिसरे पीक घेतात.या पदधतीने काम केल्यास महाराष्ट्राचा हा शेकडो वर्षांचा प्रश्न कायमचा सुटेल. यासाठी चाकोरीबाहेर जाऊन काम करावे लागेल व हा 3 मीटर खोलीचा शासन निर्णय बदलावा लागेल.

दुष्काळाला कायमचा आळा

यात कोठेही भूसंपादन नाही. विस्थापन नाही. पुनर्वसन नाही. जास्त पडलेल्या पावसाच्या पाण्याची साठवणूक व जिरवणूक होणार असल्यामुळे महापूराला कायमचा आळा बसणार आहे. जवळपास प्रत्येक गावात हा कार्यक्रम राबविला जाणार असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमची मिटणार आहे. शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. टॅकर कायमचे बंद होऊ शकतात. मुबलक पाण्यामुळे दुष्काळाला कायमचा आळा बसणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या