मनमाड नगरपरिषदेच्या सभेत गोंधळ

jalgaon-digital
2 Min Read

मनमाड । प्रतिनिधी Manmad

मनमाड नगरपरिषदेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत करोना प्रादुर्भाव काळातील साहित्य खरेदी तसेच डंम्पिंग ग्राऊंडच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली.

नगराध्यक्षा पद्मावती धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सुरू झाली. नव्याने बांधण्यात येत असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स, खड्डेमय झालेले रस्ते, अर्धवट असलेली कामे, सर्वत्र पसरलेले घाणीचे साम्राज्य यासह इतर विषयांवर नगरसेवकांनी आक्रमक भूमिका मांडली. लॉकडाऊन काळातील मालमत्ता व पाणीपट्टी कर माफ करावा तसेच थकित करावरील सर्व व्याज माफ करण्यात यावे अशी मागणी नगरसेवकांनी केली असता करमाफीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे यांनी दिले. सभेत विविध पंधरा ठराव मंजूर करण्यात आले.

काही विषयांवर नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकदेखील झाली तर नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रशासनाची तारांबळ उडाली होती. सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टिकोनातून पालिका सभागृहाऐवजी छत्रे हायस्कूलच्या सीता-लक्ष्मी हॉलमध्ये ही सभा ठेवण्यात आली. मात्र तेथेदेखील सुरक्षित अंतराचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे ते थांबवून त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांनी केली. डंम्पिंग ग्राऊंडमधील घनकचर्‍याचा मुद्दा नगरसेविका रूपाली पगारे यांनी उपस्थित करत या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत वेलमध्ये आल्या. त्यांना पाठिंबा देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकदेखील वेलमध्ये आले व ठिय्या आंदोलन सुरू केले.

घनकचरा प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत जोपर्यंत चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतल्याचे पाहून मुख्याधिकारी मुंढे यांनी लेखी देण्याचे मान्य केले. त्यानंतर प्रवीण पाटील, अमजद पठाण, रवींद्र घोडेस्वार, संतोष आहिरे, नाजीम शेख, मिलिंद उबाळे यांनी करोनाकाळात साहित्य खरेदीमध्ये तसेच कंटेनमेंट झोनसाठी बॅरिकेडिंग करण्यासाठी बांबू व मंडप लावण्याकरता झालेल्या खर्चात भ्रष्टाचाराचा आरोप केला. चर्चेत गटनेते गणेश धात्रक, पिंटू नाईक, नाजीम शेख, रूपाली पगारे आदी सदस्यांनी सहभाग नोंदवला. लियाकत शेख, प्रमोद पाचोरकर, गंगाभाऊ त्रिभुवन यांच्यासह इतर नगरसेवकांनी भाग घेतला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *