Saturday, April 27, 2024
Homeनगरजिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट घडवून फोडले एटीएम

जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट घडवून फोडले एटीएम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिलेटीन कांड्यांचा वापर करून स्फोट घडवून एटीएम मशीन फोडल्याची घटना जखणगाव (ता. नगर) शिवारातील कुंदन हॉटेलच्या शेजारी रविवारी पहाटे घडली. दरम्यान या एटीएममध्ये रक्कम नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मनोहर तबाजी काळे (वय 31 रा. जखणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास चार चोरटे वाहनातून आले. त्यांनी कुंदन हॉटेलच्या शेजारी असलेले वक्रंगी कंपनीचे एटीएम मशीन बसवलेल्या गाळ्याचे कुलुप तोडून शटर उचकटून आत प्रवेश केला. एटीएम मशीनच्या खाली जिलेटीन कांड्या लावल्या. स्फोट घडवून एटीएम मशीन फोडले. दरम्यान या एटीएममध्ये रक्कम नसल्याने चोरटे खाली हाताने परत गेले. जिलेटीन कांड्याचा वापर करून स्फोट केल्याने परिसरात आवाज झाला. यानंतर स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. नगर ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान चार चोरट्यांनी एटीएम मशीनमध्ये स्फोट केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. यापूर्वी जिल्ह्यात शिर्डी, संगमनेर येथे देखील अशा पध्दतीने एटीएम फोडून रक्कम लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या