Tuesday, May 14, 2024
Homeनगरगावाच्या विकासासाठी खेकड प्रवृत्ती बाजुला ठेवा - पवार

गावाच्या विकासासाठी खेकड प्रवृत्ती बाजुला ठेवा – पवार

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहात असलेल्या दीन दलित व भूमिहीन नागरिकांवर अतिक्रमण काढले जाण्याच्या भितीने हक्काचा निवारा जाणार असल्याने झोप उडाली आहे. अशावेळी आपसातील हेवेदावे व खेकड प्रवृत्ती बाजुला ठेवून सर्व गाव पुढार्‍यांनी एकत्र येऊन ही अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी सभापती नानासाहेब पवार यांनी केले.

- Advertisement -

या विषयावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, यशवंत रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, राजेंद्र कोकणे, शिवाजी शिंदे, नारायण काळे, बंडू हापसे, प्रा. जयकर मगर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

गायरान जमिनीवरील झालेल्या अतिक्रमणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने चांगलाच ऐरणीवर आलेला असल्याने अतिक्रमण निष्कासित करण्याच्या नोटिसा प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्यामुळे गोरगरीब, आदिवासी, मागासवर्गीय, भूमिहीन नागरिकांचा हक्काचा निवारा जाणार या भितीने चांगलेच धाबे दणाणले आहेत. याबाबत येथील सर्वपक्षिय कार्यकत्यांनी ग्रामसचिवालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी पवार म्हणाले, गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढले जाणार असल्याच्या नोटीसा नागरिकांना प्रशासनाच्यावतीने दिल्या गेलेल्या आहेत. याबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली असून सरकारने या नोटिसांना स्थगिती दिली आहे. कोणाचेही घर मोडले जाणार नाही. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी घाबरून जाऊ नये. गावठाण हद्द वाढीचा प्रस्ताव शासनदरबारी सादर केलेला आहे. मात्र या कामात गुंतागुंत अधिक असल्याने सरकारी जागेवर राहणार्‍या सर्व नागरिकांच्या राहत्या जागेवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गावपुढार्‍यांनी हेवेदावे विसरून व खेकड प्रवृत्तीला फाटा देऊन गोरगरिबांचा निवारा वाचवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. धोंडेवाडीसारखी परिस्थिती होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेऊन गावाच्या विकासासाठी शिस्त लावून घेण्याची गरज असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.

यावेळी शिवाजी शिंदे, प्रा. विजय बोर्डे, नवाज शेख, बापूसाहेब शिंदे, भाऊसाहेब मगर, प्रा. कार्लस साठे, नारायण काळे यांनीही या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी ग्रा.प.सदस्य मयुर पटारे, सुनील बोडखे, दत्तात्रय नाईक, आबासाहेब रणनवरे, रावसाहेब मगर, बाबासाहेब बनकर, विलास दाभाडे, शंकर पवार, उत्तम पवार, रावसाहेब वाघुले, कृष्णा वेताळ, लक्ष्मण सटाले, सुधीर मगर, एकनाथ बनकर, संजय पवार, मोहन कांबळे, भैय्या पठाण, भागवत रणनवरे, अण्णासाहेब दाभाडे, मोहन रणनवरे, महेंद्र संत, रघुनाथ शिंदे, महेश लेलकर, बाबा तनपुरे, भाऊसाहेब पटारे, अशोक कचे, रमेश पटारे, रामनाथ माळवदे, रामदास जाधव, दादा पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ते सदस्य भिडले एकमेकाला

गावाच्या विकासासाठी मतभेद व मनभेद विसरुन एकत्र येण्यावर बैठकीत सर्व वक्त्यांनी मार्गदर्शन केले. मात्र बैठक संपताच ‘नळी फुंकीली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ या म्हणीप्रमाणे, एकाच प्रभागातून निवडून आलेले व एकाच गटाचे सदस्य सुनील बोडखे व भाऊसाहेब पटारे यांच्यात बाचाबाची होऊन हे दोन्ही सदस्य थेट एकमेकांना भिडले. काही सुज्ञ नागरिकांनी मध्यस्ताची भूमिका पार पाडीत दोघांना बाजुला केले अन्यथा ग्रामपंचायत सभागृहात चांगलेच घमासान झाले असते. या विषयाची बैठकीपेक्षाही खरपुस चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या