Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात गट, गण संख्या पूर्ववत

जिल्ह्यात गट, गण संख्या पूर्ववत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकांप्रमाणेच गट अस्तित्वात ठेवून निवडणूक घेण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच 72 जिल्हा परिषद ( Zilla Parishad ) गट तर 144 गण राहणार असून नव्याने आरक्षण निघेल, असे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने निवडणुक प्रक्रीया लांबली होती. यातच महाविकास आघाडी सरकारने, जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समित्यांचे गण वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या गट संख्या 72 वरून 84 झाली तर, पंचायत समिती गण संख्याही 144 वरून 168 करण्यात आली.

सन 2021 ची जनगणना झालेली नसल्याने 2011 ची लोकसंख्या गृहीत तरून गट निश्चिती करण्यात आली होती. तसेच पूर्वीप्रमाणेच चक्राकार पध्दतीने आरक्षण काढण्याचे निर्देश राज्य निवडणुक आयोगाने दिले होते. त्यानुसार गट रचना करून, आरक्षण सोडत काढण्यात आली होती.दरम्यान, मागील आठवड्यात आरक्षण सोडतीत आदिवासी तालुक्यांमधील सर्व गट खुले झाले असून बिगर आदिवासी तालुक्यांमधील गट राखीव झाले आहे.

गट आरक्षण सोडतीत, लोकसंख्येचा निकष धरण्याचे आदेश आहे. यामुळे 2017 मध्ये राखीव असलेल्या गटांवर पुन्हा आरक्षण पडले आहे. निफाड, येवला, नांदगाव, सिन्नर, येवला या तालुक्यातील सर्वसाधारण गटातील इच्छुकांना उमेदवारीसाठी गट नसल्याने,तसेच आदिवासी तालुक्यातील गट खुले झाल्याने आदिवासींना गटाची शोधाशोध सुरू असल्याची ओरड आहे. या पार्श्वभूमीवर हे गट आरक्षण रद्द करण्याची मागणी सुरू होती. याचाच आधार घेत, वाढीव गट रचना रद्द करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारकडून घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे आरक्षण देखील रद्द होणार असे सांगितले जात आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या इच्छुकांमध्ये पुन्हा खुशीची लहर येणार, अशी चिन्हे आहेत. जिल्हा परिषदेचे सन 2017 मध्ये 73 गट होते. मात्र, ओझर नगरपालिका झाल्याने हा गट रद्द करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. त्यामुळे 72 गट अस्तित्वात होते. ही 72 गट जैसे थे राहणार असून, गत आठवडयात काढलेले आरक्षण देखील रद्द करून नवीन सोडत काढली जाणार आहे. या मध्ये अनुसूचीत जमातीसाठी 29 तर, जातींसाठी 5 व ओबीसींसाठी दोन गट राखील असतील, उर्वरित 37 गट खुले होण्याची शक्यता आहे. यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या