Thursday, April 25, 2024
Homeनगरगॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांचा छापा

गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांचा छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वतःच्या व इतरांच्या जिवितास धोका होईल, अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये गॅस भरणार्‍यावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 66 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

सहाय्यक पोलीस अधिक्षक चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, हवालदार व्ही.एन. काळे, एस. व्ही. सरोदे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी हवालदार याकुब अहमद सय्यद यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 5 रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास आयुर्वेद कॉर्नर ते नेप्ती चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर वाहने रस्त्याच्याकडेला उभे करुन नालेगाव अमरधाम शेजारी असलेल्या मोकळया ठिकाणी एक इसम एका मशिनद्वारे घरगुती गॅस टाकीमधून ऑटो रिक्षामध्ये (एमएच 12 सीएच 3665) इलेक्ट्रीक मोटर पंपाचे सहाय्याने गॅस भरत असल्याचे दिसून आले.

त्याने त्याचे नाव निरंजन ऊर्फ विशाल विजय कांबळे (वय 30, रा. नाथ हॉस्पीटल, काटवन खंडोबा, (मूळ रा. कन्हान नगर झोपडपट्टी, सीबीएस बस स्टॅन्ड जवळ, कोल्हापुर) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे गॅस परवानाबाबत विचारपूस केली, असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. या ठिकाणी कांबळे, याने त्याच्या ताब्यातील इलेक्ट्रॉनिक वजन काटा व रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी क्रिस्टल 30 पॉवर स्प्रेअर कंपनीचा प्रेशर पंप असून त्या काट्यावर घरगुती गॅस टाकी उलटी ठेवून त्यामध्ये पाईप टाकून मशीनव्दारे रिक्षामध्ये भरताना मिळून आला. या ठिकाणी मिळालेल्या गॅस सिलेडंर हे गॅस वितरण करणार्‍या भारत गॅस कंपनीच्या गाडयामधून घेतल्याचे त्याने सांगितले.

या ठिकाणी मिळून आलेल्या रिक्षाच्या मालकाबाबत या इसमाकडे चौकशी केली असता त्याने काही माहिती दिली नाही. 30 हजार रूपये किंमतीची ऑटो रिक्षा (एमएच 12 सीएच 3665), 4 हजाराच्या भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या भरलेल्या लाल रंगाच्या 2 सिलबंद गॅस टाक्या, 6 हजाराच्या भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या मोकळ्या लाल रंगाच्या 6 गॅस टाक्या, 1 हजाराची भारत गॅस कंपनीची घरगुती वापराच्या अर्धवट भरलेल्या 1 गॅस टाकी, 5 हजाराचे दोन वजनकाटे, 7 हजाराचा प्रेशर पंप, 3 हजाराची मोटर मशिन, 5 हजार 500 रूपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल आढळून आला. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या