Thursday, April 25, 2024
Homeधुळेनेर शिवारात महामार्गावर टँकरमधून गॅस गळती

नेर शिवारात महामार्गावर टँकरमधून गॅस गळती

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

गुजरात राज्यातील भरुच येथून चाळीसगाव येथे जाणार्‍या टँकरमधून सुरत-नागपूर महामार्गावर धुळे तालुक्यातील नेर शिवारात एलएनजी गॅस गळती झाली.

- Advertisement -

हा गॅस ज्वालाग्रही नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. खबरदारी म्हणून टँकर एका हॉटेलच्या आवारात लावण्यात आले आहे. गॅस गळती झाल्यामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

भरुच येथून जीजे 12 व्हीटी 3160 या क्रमांकाच्या टँकर गॅस घेवून नागपूर-सुरत महामार्गावरुन चाळीसगाव येथे जात होता.

परंतू धुळे तालुक्यातील नेर शिवारात गॅस गळती सुरु झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने टँकर थांबवून पोलीस यंत्रणेला माहिती दिली.

त्यानंतर पोलीस निरिक्षक हेमंत पाटील हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. गॅस कंपनीच्या संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली.

टँकरमध्ये असलेले रसायन नॅचरल गॅस असून त्यापासून सीएनजी गॅस बनवला जातो. तसेच हा गॅस स्फोटक तसेच ज्वालाग्रही नसून तो जड असल्याने जमीनीवर पडतो.

त्यामुळे धोका कमी आहे. सदर टँकर एका हॉटेलच्या आवारात लावण्यात आला आहे. गॅस कंपनीने तातडीने दुसरा टँकर पाठविला असून तज्ज्ञांच्या मदतीने गॅस दुसर्‍या टँकरमध्ये भरण्यात येत आहे. पोलीस बंदोस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या