घंटा गाड्यांची उंची कमी करण्यासाठी दोन तास आंदोलन

jalgaon-digital
2 Min Read

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शहरातील कचरा संकलन करण्यासाठी असलेल्या नगरपरिषदेच्या घंटागाड्यांची उंची जास्त असल्याने त्यात कचरा टाकण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागते.

अनेक ठिकाणी ओट्यांचा वापर करून कचरा गाडीत टाकावा लागत असल्याने घंटागाड्यांची अशी रचना नेमकी कोणाच्या सोयीसाठी केली, असा प्रश्न आता शेवगावकरांना पडला आहे. याबाबत महिलांनी आंदोलन करून दोन तास घंटागाडी रोखून धरत नगरपरीषदेचे लक्ष वेधले.

शहरातील कचरा संकलनाचे काम टेंडर संपल्यामुळे सध्या नगरपरिषदेकडे असून त्यासाठी सात घंटागाड्या आहेत. त्यातील तीन पूर्वीच्या तर चार नव्याने घेण्यात आलेल्या आहेत. त्या चारही गाड्यांची अद्याप उपप्रादेशीक वाहतूक कार्यालयाकडे नोंदणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे विनाक्रमांकाच्या असून कचरा संकलनाचे काम करतात.

या गाड्यांची बांधणी करताना त्यांची उंची प्रमाणापेक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. त्यामुळे त्यात कचरा टाकण्यासाठी नागरिकांना व महिलांना मोठी कसरत करावी लागते. अनेक वेळा तर ओट्यांचा किंवा उंच जागेचा वापर करून कचरा त्यात टाकावा लागतो.

मात्र गल्लीत गाडी आल्यानंतर अशी उंच जागा उपलब्ध नसल्यास तो कचरा गाडीतील कचरा कुंडीत न जाता काही रस्त्यावर तर काही टाकणार्‍या महिलांच्या अंगावर पडतो. त्यामुळे गाडीत कचरा टाकणे म्हणजे मोठी जिकिरीची बाब होऊन बसली आहे.

करोनाच्या पार्श्वभुमीवर घंटागाडीतील कर्मचार्‍यांना सुरक्षेविषयक साधने उपलब्ध नसल्याने ते हातात कचरा घेऊन गाडीत टाकत नाहीत. त्यामुळे अनेकदा नागरिक व महिलांसोबत वादाचे प्रसंग निर्माण होतात. आज सोमवार दि.7 रोजी नेवासे रस्त्यावरील सिध्दीविनाक कॉलनीत घंटागाडीतील कर्मचारी व महिलांचे याच कारणावरून वाद झाला.

अंजली कुलकर्णी, माधुरी पाटील, रचना पाटील, शीतल बोरा, उषा दहिवाळकर, स्मिता देशपांडे, पल्लवी पांडव आदी महिलांनी दोन तास घंटागाडी अडवली. त्यानंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्याशी चर्चा केली असता गाडीची उंची कमी करणार असल्याचे त्यांनी सांगितली. अशीच परिस्थिती इतर उपनगरात आहे. संबंधित वाहनातील कर्मचारी महिलांनी कचरा गाडीत टाकण्याची विनंती केली तर हे आमचे काम नसल्याचे सांगतात.

घंटागाडीच्या उंचीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून तक्रार करत आहेत. आता मुख्याधिकार्‍यांनी दोन दिवसांची मुदत दिली आहे. मात्र त्यानंतरही या गाड्यांची उंची कमी न केल्यास रस्त्यावर कचरा टाकून नगरपरिषदेचा निषेध करणार आहोत.

– माधुरी पाटील, सिध्दीविनायक कॉलनी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *