Sunday, May 5, 2024
Homeनगरगणोरे मार्गे बसेस सुरू करा, अन्यथा रास्तारोको

गणोरे मार्गे बसेस सुरू करा, अन्यथा रास्तारोको

गणोरे |वार्ताहर| Ganore

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी संगमनेर आगाराने गणोरे मार्गे सुरू असणारी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू न केल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच शाळा, महाविद्यालय सुरू झाले असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. ही बाब लक्षात घेता दोन्ही आमदारांनी या मार्गावरील बस सुविधा पूर्वीप्रमाणे सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे.

- Advertisement -

गेली दोन वर्षे करोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळपास बंद होती. त्यानंतर एसटीने केलेला बंद, त्यातही वाहतूक व्यवस्था सुरू होऊ शकली नाही. आता मात्र करोना नियंत्रणात आला असून संपही मिटला आहे. अशावेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्याची अपेक्षा होती. मात्र अकोले आगाराच्यावतीने गणोरे मार्गे जाणार्‍या या बसेस अद्यापपावेतो सुरू होऊ शकलेल्या नाहीत.

संगमनेर आगाराच्यावतीने केळी सांगवी, समशेरपूर, टाहाकारी, विरगाव या गावांसाठी जाणार्‍या बसेस अद्यापही सुरू होऊ शकलेल्या नाही, त्यामुळे नागरिकांना मोठ्या कुचंबनेला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू असल्याने अनेकदा नागरिकांना खाजगी वाहतूक व्यवस्थेचा पर्याय निवडावा लागत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी वर्गाची ये-जा असते मात्र तरीसुद्धा संगमनेर अकोले आगाराचे आगारप्रमुख यांनी अद्याप पावेतो या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरू केली नाही.

ज्येष्ठांची होते कुचंबना

या परिसरात संगमनेर अकोले तालुक्यातील राजापूर, जवळेकडलग, गणोरे, विरगाव, देवठाण, सावरगाव पाट, समशेरपूर, खिरविरे, कोंभाळणे, टहाकरी, केळी, सांगवी यासारखा मोठा परिसर समाविष्ट आहे. या परिसरातील शासकीय कामे तालुक्याला असतात तर अनेकदा शेती उपयोगी अवजारे, साहित्य, वैद्यकीय उपचार यासाठी संगमनेरला जावे लागते. वृद्धांना सार्वजनिक सुविधांशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही अशा परिस्थितीत उपचार करण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्याने ज्येष्ठांचीही मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. त्यांना खासगी वाहतुकीने प्रवास करावयाचा झाल्यास पूर्ण दराने पैसे द्यावे लागत असल्याने आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

शाळा-महाविद्यालये सुरू झाली, विद्यार्थ्यांची कुचंबना

आढळा परिसरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती उच्च शिक्षणासाठी संगमनेर- अकोले याठिकाणी जात असतात. आता महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून महाविद्यालये सुरू झाली आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची नितांत गरज आहे पण बस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पालकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. प्रमुखांनी पूर्वीप्रमाणे वाहतूक व्यवस्था सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी वर्गाच्यावतीने देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या