गंगापुरचे पाणी आता थेट नाशिकरोड विभागात

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकरोड येथील चेहडी येथील जॅकवेल जवळ वालदेवी बंधार्‍यातून मिसळणारे सांडपाण्यामुळे नाशिकरोड विभागातील काही भागात लाल आळ्यायुक्त पाणी पुरवठ्यासंदर्भात तक्रारी आहे. हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी निकाली काढण्यासंदर्भात नाशिकरोड विभागात गांधीनगर येथील जलशुध्दीकरण केंद्रापासुन गंगापूर धरणातील पाणी पुरवठा नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्रापर्यत नेण्याच्या 19 कोटींच्या पाईपलाईन कामास नुकतीच महासभेने मंजुरी दिली आहे. यामुळे आता नाशिकरोडचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.

नाशिकरोड विभागातील पाणीप्रश्नासंदर्भात सर्व पक्षीय नगरसेवकांनी आजपर्यत केलेल्या विविध आंदोलनाचा आणि थेट महापौर व आयुक्त यांच्याकडे गार्‍हाणी मांडल्यामुळे आता काही दिवसात नाशिकरोड विभागाला थेट गंगापूर धरणातील स्वच्छ पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिकरोड विभागाला चेहडी शिवारातील दारणापात्रातील जॅकवेल मार्फत पाणी पुरवठा केला जातो. मात्र दारणानदीचे पाणी आटल्यानंतर उन्हाळ्यात चेहडी बंधार्‍याजवळ वालदेवी नदीत येणार्‍या सांडपाण्यामुळे याठिकाणी लाल आळ्या निर्माण होऊन दुषीत पाणी पुरवठा नाशिकरोड विभागात होतो.

यावरुन नगरसेवकांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधतांना आंदोलने केली. यावर पाणी पुरवठा विभागाकडुन काही पर्याय सुचविण्यात आले होते. मात्र तातडीचा उपाय म्हणुन गंगापूर धरणातून बारा बंगला आणि येथून गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र असे येणारे पाणी पुढे थेट नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्रापर्यत नेण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने करीत यासंदर्भात डॉकेट गेल्या महासभेत ठेवले होते. यास नगरसेवकाच्या आंदोलनाचा व त्यांच्या भावनेचा विचार करीत महापौर सतिश कुलकर्णी यांनी 19 कोटी रुपयांच्या खर्चाच्या कामास मंजुरी दिली आहे.

या मंजुरीनंतर आता गांधीनगरपर्यत येणारे गंगापूर धरणाचे पाणी पुढे 5 ते 6 कि. मी. अंतराने पुढे पाईपलाईनद्वारे नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्रापर्यत नेले जाणार आहे. या कामाची आता लवकरच निवीदा काढण्यात येणार आहे. हे काम झाल्यानंतर नाशिकरोडचा कृत्रिम पाणीटंचाई व दूषीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. मुकणे धरणातून इंदिरानगर व नवीन नाशिक भागात पाणी पुरवठा सुरू झाल्याने गंगापूर धरणावरील ताण कमी झाल्यानंतर आता लवकरच गंगापूरचे पाणी नाशिकरोडकरांना मिळणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *