Friday, April 26, 2024
Homeनगरमोठी बातमी : गंगामाई साखर कारखानाच्या इथेनॉल प्लांटला भीषण आग

मोठी बातमी : गंगामाई साखर कारखानाच्या इथेनॉल प्लांटला भीषण आग

शेवगाव |बोधेगाव| वार्ताहार| Shevgav

शेवगाव तालुक्यातील नाजिक बाभुळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पात शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत इथेनॉल प्रकल्पाच्या 6 टाक्यांचा स्फोट झाला. 3 कामगार भिंतीवरून उड्या मारत असताना जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीत कारखान्याचे कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पात शनिवारी सायंकाळी 7 वाजता अचानक आग लागली. काही वेळात आग भडकली. लगतच इथेनॉल असल्यामुळे आग वेगाने पसरली. यामुळे कारखाना परिसरातून नागरिकांना दूर राहण्याचे आदेश देण्यात आले. प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आगीपासून बचाव होण्यासाठी परिसरातील नागरिक, कामगार, कर्मचारी यांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात आले. स्फोट आणि आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत असल्याने परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. आगीचा भडका उडताच नागरीकांची पळापळ सुरू झाली. ऊस तोडणी कामगार झोपड्या सोडून पळू लागले होते.

आग आटोक्यात आणण्यासाठी ज्ञानेश्वर साखर कारखाना, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे कारखाना, पाथर्डी व पैठण नगरपालिकांचे अग्निशमन बंब असे एकूण 10 बंब पाचारण करण्यात आले. काही वेळात बंब दाखल झाल्यानंतर उशिरा रात्रीपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न होते. तीन तासाहून अधिक काळ आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू होते.

जखमी कामगारांना शेवगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे. आग लागली त्यावेळी 35 कामगार काम करत असल्याचे समजते. त्यापैकी 25 कामगार सुखरूप बाहेर आले आहेत. अन्य कामगारांशी संपर्क होवू शकला नाही. आगीची माहिती मिळताच शेवगावचे तहसिलदार छगन वाघ, पोलीस निरिक्षक विलास पुजारी तसेच इतर प्रशासनकीय अधिकार्‍यांनी कारखानास्थळावर धाव घेतले आहे.

गंगामाई कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाला लागलेल्या आगीत कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. सर्व कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये.

– रणजित मुळे, कार्यकारी संचालक, गंगामाई साखर कारखाना.

स्फोटांनी हादरला परिसर

इथेनॉलची टाकी फुटल्याने आग भडकल्याचे म्हटले जात आहे. प्रकल्पात लागलेल्या आगीत 6 इथेनॉल टाक्यांचे एकापाठोपाठ स्फोट झाले. या स्फोटांमुळे परिसर हादरला. अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले तर अनेक घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्याची माहिती नागरीकांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या