Wednesday, April 24, 2024
Homeनगरसदगुरु योगीराज गंगागिरी महाराज 174 व्या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

सदगुरु योगीराज गंगागिरी महाराज 174 व्या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

अस्तगाव |वार्ताहर|Astgav

श्रीक्षेत्र सराला बेटावर योगिराज सदगुरू श्रीगंगागिरी महाराज यांच्या 174 व्या अखंड हरिनाम सप्ताहास काल मोठ्या उत्साहात आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व महंत रामगिरी महाराज यांच्या सुश्राव्य भजनाने प्रारंभ झाला. बेटावरील मुख्य मंदिराचा भगवा ध्वज आणि सप्ताहाचा ध्वज मोठ्या दिमाखात फडकला. या पवित्र तिर्थक्षेत्री सात दिवस भजनाचे सूर घुमणार आहेत.

- Advertisement -

याप्रसंगी महंत रामगिरी महाराज यांचेसह अण्णासाहेब म्हस्के, आ. प्रा. रमेश बोरणारे, सप्ताह समितीचे अध्यक्ष साबेरभाई खान, उपाध्यक्ष अंबादास ढोकचौळे, दीपकराव पटारे, बाजार समितीचे उपाध्यक्ष नितीनराव भागडे, जि. प. सदस्य शरद नवले, भाजपाचे तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, गिरीधर आसने, भाऊसाहेब बोंदरे, शंतनू फोपसे, कडूभाऊ काळे, बाळासाहेब कापसे, अशोकराव बोर्‍हाडे, बाबासाहेब चिडे, वैजापूरचे दिनेश परदेशी, विशाल संचेती, गंगापूरचे अविनाश गलांडे, सुभाषराव गमे, मच्छिंद्र चोळके, अंबादास बनकर, नारायण डावखर, भैय्या पाटील, बाबासाहेब जगताप, किशोर थोरात, भाऊसाहेब फुलारे यांचेसह मोजके भाविक, महाराज मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते.

आ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सदगुरू गंगागिरी महाराज यांनी सुरू केलेली परंपरा नारायणगिरी महाराज यांनी 50 वर्षे पुढे नेली. आता महंत रामगिरी महाराज पुढे नेत आहेत. हे कार्य कधीच थांबणार नाही. हे अधिष्ठानातून मानवतेच्या कल्याणाची परंपरा पुढे नेण्याचे काम होत आहे. गंगागिरी महाराजांनी अध्यायात उल्लेख केल्याप्रमाणे साईबाबांचा परिचय करून दिला. संतांची महती संतच जाणतो.

महंत रामगिरी महाराज म्हणाले, सदगुरू योगिराज गंगागिरी महाराजांनी 174 वर्षांपुर्वी परंपरा सुरू केली. या परंपरेच्या माध्यमातून गंगागिरी महाराजांनी अज्ञानी लोकांना सन्मार्गाला लावण्याचे काम केले.

आ. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह झाला. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची आठवण करत महंत रामगिरी महाराज म्हणाले, खा. डॉ. विखे यांनी चांगले नियोजन केले होते. त्या सप्ताहाने विविध विक्रम केले. भाविकांना सप्ताहासाठी बेटावर येता येणार नाही. आलेल्यांनाही बाहेर जाता येणार नाही. प्रशासनाला सहकार्य करा. सदगुरू गंगागिरी महाराज संस्थान या युट्यूब चॅनलवर भाविकांना घरात बसून मोबाईलवर सरळ प्रक्षेपण बघता येईल. बेटाच्या विकासाला सहकार्य करावे, असे आवाहन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

याप्रंसगी सप्ताहाचे अध्यक्ष साबेरभाई खान यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन शिवाजी ठाकरे यांनी केले. आभार आ. प्रा. रमेश बोरणारे यांनी मानले. या सोहळ्यास रमेश जवरे, मधुकर महाराज, बाळासाहेब महाराज रंजाळे, चंद्रकांत महाराज सावंत, दत्तु खपके, नवनाथ महाराज आंधळे, अमोल महाराज बडाख, संदीप महाराज, मधुसुदन महाराज, महेंद्र महाराज निकम, नवनाथ मेहेत्रे, डॉ. विजय कोते, सावंत यांचेसह भाविक उपस्थित होते.

विखे परिवाराची बेटावर निष्ठा !

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणीच्या सप्ताहाचे स्मरण करत आपल्या कुटुंबाची नाळ बेटाशी पद्मश्री विखे पाटील यांचेपासून जुळली आहे. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनीही ही परंपरा पुढे चालविली. आमची पिढी सुध्दा त्याच समरसतेने ही परंपरा पुढे नेत आहे. बेटावरचे आमचे नाते पुर्वपार आहे. हे नाते दाखविण्यासाठी किंवा मिरविण्यासाठी नाही. हे नाते श्रध्देचे आणि निष्ठेचे आहे, असेही आ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री निधीला मदत करणार!

महापुराने राज्यातील काही जिल्ह्यांत हानी झाली. अनेकांना आपले जीव गमवावे लागले. नुकसान झाली. लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती ढासळली. त्या अनुशंगाने सराला बेट व सदगुरू गंगागिरी महाराज भक्त मंडळ यांच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यात येणार असल्याचे महंत रामगिरी महाराज यांनी यावेळी जाहीर केले. त्या बाधित लोकांना ही मदत देणार आहोत. भाविकांनीही मदत करावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या