Friday, April 26, 2024
Homeनगरगणेशमूर्ती विसर्जनासाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करा- ससाणे

गणेशमूर्ती विसर्जनासाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करा- ससाणे

देवगडफाटा |वार्ताहर| Devgad Phata

गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास बंदी असून पारंपरिक वाद्याचा वापर करावा. शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे यांनी केले.

- Advertisement -

नेवासा पोलीस ठाण्याअंतर्गत प्रवरासंगम पोलीस दूरक्षेत्र हद्दीमधील 25 गावांतील सरपंच, गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी व पोलीस पाटील यांची बैठक प्रवरासंगम येथील हिरा सांस्कृतिक भवनात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. ससाणे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जावा अशी अपेक्षा व्यक्त करून सामाजिक सलोखा कायम ठेवून गणेशोत्सव साजरा करावा, पारंपरिक व देशी खेळाचे आयोजन करण्यात यावे, रक्तदानासारखे उपक्रम राबविले जावे, असे आवाहन केले.

शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करावे. गणेश मिरवणुकीत डीजे वाजवण्यास बंदी असून पारंपरिक वाद्य वाजवावे. मुदत दिलेल्या वेळेतच गणेशाचे विसर्जन करावे, असे आवाहन केले. खबरदारी, करावयाच्या उपाययोजना, गणपती विसर्जन मिरवणूक अशा विविध सूचना यावेळी ससाणे यांनी दिल्या. याप्रसंगी मुळा कारखाना संचालक बाळासाहेब पाटील, दिनकरराव कदम, गोधेगावचे सरपंच राजेंद्र गोलांडे, पोलीस पाटील बाळकृष्ण भागवत, साळुंके, पोलीस कॉन्स्टेबल वसीम इनामदार, राम वैद्य आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या