गणेश भांड शिंदेसेनेच्या वाटेवर ?

jalgaon-digital
2 Min Read

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Devalali Pravara

चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष, तरुण उद्योजक गणेश भांड हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेत लवकरच जाणार असल्याचे खात्रीशीर वृत्त असल्याने राजकीय गटात चर्चेला उधाण आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई येथे निवासस्थानी गणेश भांड यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांसमवेत जाऊन पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यामुळे राजकीय पुढार्‍यांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय गटात खळबळ उडाली आहे.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेची निवडणूक तोंडावर असल्याने या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सध्या देवळाली प्रवरा नगरपरिषदेमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीची या ठिकाणी ताकद कमी झाली असल्याने भाजपा समोर एकमेव विरोधक गणेश भांड हेच आहेत. या निवडणूकीत तेच भाजपाला कडवी झुंज देऊ शकतात. सोसायटी निवडणुकीमध्ये जरी भांड यांच्या गटाला पराभवाचे तोंड पहावे लागले असले तरी सोसायटीची निवडणूक व नगरपरिषदेची निवडणूक यात मोठा फरक आहे. त्यामुळे सोसायटी निवडणुकीची तुलना नगरपरिषद निवडणुकीबरोबर होऊ शकत नाही, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

भाजपाला भांड यांचा पुन्हा एकदा मोठा अडसर निर्माण होणार आहे. नगरपरिषद निवडणुकीत ते सवतासुभा उभारण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. नगरपरिषद निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याने नगराध्यक्षपदाची निवड देखील नगरसेवकांमधूनच होण्याची शक्यता आहे. यामुळेच आपल्या जर एखाद्या मोठ्या राजकिय पक्षाचे पाठबळ असले तर आपल्याला स्वतंत्र आघाडी किंवा स्वतंत्र गट स्थापन करता येईल व होणार्‍या निवडणुकीत जास्तीजास्त जागा पदरात पाडून घेता येतील आणि असे झाले तर नगराध्यक्षपदाला देखील कडवी झुंज देता येईल, असे आडाखे असल्याची चर्चा आहे. म्हणूनच मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतची भांड यांची भेट महत्वाची समजली जात आहे.

याबाबत गणेश भांड यांच्यासोबत चर्चा केली असता ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत सदिच्छा भेट होती. या भेटीत आमची कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. नगरपरिषद निवडणुकीबाबत ते म्हणाले, माझे राजकीय सहकारी मित्र व कार्यकर्ते यांच्यासोबत या विषयावर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. तसेच विखे हे माझे दैवत असल्याने त्यांच्या सहमतीशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, भांड यांच्या समर्थकांनी ते शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *