Thursday, April 25, 2024
Homeनगरउत्साहपूर्ण वातावरणात संगमनेरात गणरायाला निरोप

उत्साहपूर्ण वातावरणात संगमनेरात गणरायाला निरोप

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या..! च्या जयघोषात संगमनेरच्या मानाच्या सोमेश्वर तरुण मित्र मंडळाच्या गणरायाला शुक्रवारी निरोप देण्यात आला. उत्साही वातावरणात ढोल ताशांच्या गजरात पारंपारीक पद्धतीने सकाळी 9 वाजता सुरु झालेल्या विसर्जन मिरवणूकीची सांगता रात्री 12 वाजेच्या दरम्यान झाली. गणेश विसर्जन मिरवणूकीत मानाचे 10 व इतर 9 असे एकूण 19 मंडळे सहभागी झाली होती. कुठलेही विघ्न न येता गणेश विसर्जन शांततेत पार पडले. करोनामुळे मागील दोन वर्षे कोणतेही सण, उत्सव साजरे करण्यावर शासनाने निर्बंध घातले होते. मात्र निर्बंध शिथील झाल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

- Advertisement -

सकाळी 9 वाजता मानाच्या सोमेश्वर तरुण मित्र मंडळाच्या गणरायाची पालखी मिरवणूक, तर नगरपालिकेच्यावतीने सजविण्यात आलेल्या ट्रॅक्टरमध्ये गणराय विराजमान झाले होते. पारंपारिक पद्धतीने गणरायाची विधीवत पुजा काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. ढोल-ताशांचे पथकाने जोरदार सलामी दिली. उत्साही वातावरणात निघालेली मिरवणूक हळूहळू पुढे सरकु लागली. तसे एका मागोमाग एक गणेश मंडळे मिरवणूकीत सहभागी झाले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, तहसिलदार अमोल निकम, मुख्याधिकारी राहुल वाघ, उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, माजी नगरसेवक किशोर पवार, जयंतराव पवार, राजाभाऊ अवसक, शैलेश कलंत्री, नितीन अभंग, निखील पापडेजा, मंडळाचे अध्यक्ष मुकुंद गरुडकर आदि उपस्थित होते.

सोमेश्वर तरुण मित्र मंडळ रंगारगल्ली पाठोपाठ चौण्डेश्वरी मित्र मंडळ मेनरोड, साळीवाडा मित्र मंडळ, राजस्थान युवक मंडळ, चंद्रशेखर हिंदू गणेश मंडळ, नेहरु चौक मित्र मंडळ, महात्मा फुले तरुण मित्र मंडळ माळीवाडा, स्वामी विवेकानंद तरुण मित्र मंडळ कुंभार आळा या मानाच्या गणेश मंडळांसह युवक मंडळे सहभागी झाली.

सय्यद बाबा चौकात उरुस समिती, शिवसेना शाखा क्रमांक 11, महात्मा फुले प्रतिष्ठाण, संगमनेर नगरपालिका यांच्यावतीने गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले.

संगमनेरच्या गणेश विसर्जन मिरवणूकीत कुठलाही अनूचीत प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील व श्रीरामपूरच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

गवंडीपुरा, श्रीकृष्ण मंदीर, पाटील चावडी, साईनाथ चौक, माळीवाडा, नगरपालिका ते नदीपात्र या मार्गाने विसर्जन मिरवणूका निघाल्या. तर ग्रामीण भागातील गणेश विसर्जन रात्री 10 पर्यंत शांततेत पार पडले होते.

प्रवरा नदीचे पावित्र्य राखण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणूकीनिमित्ताने पर्यावरण प्रेमी, कार्यकर्ते तसेच संगमनेर शहरातील पर्यावरण प्रेमी संस्था व संगमनेर नगरपरिषद आरोग्य विभाग यांच्यावतीने गणपती विसर्जनासाठी आणलेले निर्माल्य एकत्र गोळा करुन त्याचे वर्गीकरण करण्याचे काम केले तर मिरवणूकीदरम्यान गुलालाऐवजी झेंडूच्या फुलांची मुक्त उधळण करुन लोकमान्य टिळक यांना साजेशा असा गणेश उत्सव संगमनेरकरांनी साजरा केला. नदीपात्रालगत एकविरा फाऊंडेशन, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल व दुर्गावाहिनीच्या कार्यकर्त्यांनी गणेश मुर्ती जमा करुन घेत त्यांचे विर्सजन केले. विविध समाजप्रबोधनपर देखावे उत्सव काळात गणेश मंडळांनी सादर केले होते. यंदाचा गणेशोत्सव विना अडथळा शांततेत पार पडला.

एकविरा फाऊंडेशन : गणपती निर्माल्याची साफसफाई

एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरातील 300 युवक – युवतींनी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रवरा काठी निर्माल्य गोळा करुन साफसफाई व गणेश विसर्जनात काम केले. गणेश उत्सवानिमित्त संगमनेर शहरातील अनेक मानाचे व इतर गणपती, घरगुती गणपती प्रवरा नदीकाठी विसर्जित करण्यासाठी आलेले असतात काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व शहराच्या माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा युवक-युवती फाउंडेशनच्या वतीने नदीकाठी साफ सफाई अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत प्रवरा नदीकाठी असलेल्या गंगामाई घाटाच्या ठिकाणी, म्हाळूंगी नदीच्या काठी गणेश विसर्जन करण्यात येणार्‍या विविध ठिकाणी या युवक-युवतींनी निर्माल्य गोळा केले. येणार्‍या भाविकांना प्रवरेच्या पुराची माहिती सांगून आपण सर्व निर्माल्य एका ठिकाणी गोळा करावे. तसेच गणेश विसर्जन सुद्धा नगर परिषदेने केलेल्या तळ्यामध्ये करावे यासाठी सुद्धा विनंती केली. यामुळे अनेक शहरातील नागरिकांची सोय झाली. अनंत चतुर्थीच्या दिवशी युवतींनी पुढाकार घेत निर्मले गोळा केल्याने मलाही खूप आनंद झाला. समाजामध्ये अस्वच्छतेमुळे अनेक रोगांचा फैलाव होत असून स्वच्छता हाच चांगल्या आरोग्यासाठी मोठा मूलमंत्र असल्याचेही डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतआहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या