Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधश्री गजानन विजय ग्रंथ

श्री गजानन विजय ग्रंथ

श्री गजानन महाराजांनी समाधी घेतल्यावर आता या शेगावमध्ये काय राहीले? असे सर्वच जण चर्चा करीत असे. पण ती केवळ कोरी कल्पना होती. कारण अदृश्यपणे महाराजांचा वास शेगावात आहे. गजानन महाराज ज्यांचा दृढ विश्वास आहे त्यांना महाराज स्वयंमेव दर्शन देतात.

श्री. गणपतराव कोठाडे नावाचे एक भाविक गृहस्थ होते. हे शेगावातल्या दुकानात रायली कंपनीचे एजंट म्हणून काम करत होते. एकदा त्यांच्या मनात अस आलं की, येत्या विजयादशमीच्या दिवशी समाधीला अभिषेक करून ब्राह्मणभोजन घालावे. म्हणून त्यांनी अभिषेकाची पूर्ण तयारी केली होती. भोजनसामुग्री म्हणून मोठ्या प्रमाणांत शिधा मठात पाठवला. ते पाहून त्यांची पत्नी त्यांना म्हणाली, अहो तुम्ही अनाठायी खर्च का करता ? विजयादशमीचा सण आहे. मुला बाळांना काही कपडे तरी घ्या. अभिषेक व ब्राह्मणभोजने करणे काही योग्य नाही. ही काय गृहस्थाची रीत आहे? थोडं धन तरी हाती पायी राहायला पाहिजे हे कांतेचे भाषण गणपतरावांना अजिबात आवडले नाही. त्याच रात्री त्यांच्या पत्नीला स्वप्न पडले व श्री गजानन महाराज स्वप्नात येऊन तिला म्हणाले, तू उगाच पतीला छळू नकोस. तो जे जे करतोय ते करू दे त्याला. वेडे अशाश्वताचे प्रेम बाळगू नको. यामध्ये काही सार नाही. येथील धन येथेच राहणार आहे. मात्र आपलं पाप पुण्य आपल्या बरोबरच येतं. अभिषेक ब्राह्मणभोजन हे पारमार्थिक पुण्य आहे. त्यासाठी खर्च केला तर तो बेकार जाणार नाही. पेरलेल्या बीजाप्रमाणे त्याची स्थिती होते. म्हणून पोरी, तो जे करतोय ते त्याला करू दे. तू उगीच अडथळा करू नकोस.

- Advertisement -

हे स्वप्न जेव्हा तिनं आपल्या पतीला सांगितलं तेव्हा ते ऐकून गणपतरावांना हर्ष झाला. ते पत्नीला म्हणाले, महाराज येथेच आहेत. त्याचं तुला आता प्रत्यंतर आलं ना? आता कुविचार करणं सोडून दे. अगं मुलं, धनदौलत हे सर्व गजानन महाराजांचे आहे. त्यामुळे त्यांची सर्व चिंता त्यांना असल्याने तू काळजी करू नकोस. गणपतरावांनी दसर्‍याच्या शुभ मुहुर्तावर आनंदाने पूजन केले. खर्चही उत्तम केला.

लक्ष्मण हरी जांजळ यांना एकदा असाच अनुभव आला.ते बोरीबंदर स्टेशनवर काही कामानिमित्त मुंबईला जाण्यासाठी आले होते. वारंवार येणार्‍या घरच्या कटकटीने वैतागून गेले होते. आता मात्र ते व्यापाराच्या संबंधात ते मुंबईस आले होते. काम झाल्यावर घरी जाण्यासाठी म्हणून ते जेव्हा बोरीबंदर स्टेशनवर आले तेव्हा तेथे त्यांना एक परमहंस भेटले. ते आजानबाहु व उंच बांध्याचे होते. त्यांची दृष्टि नासाग्री होती व त्यांच्या मुख़ातून ओंकाराचा जप चालला होता. ते लक्ष्मणाना म्हणाले, तूं गजाननाचा शिष्य आहेस ना , मग असा हताश का होतोस तेच मला कळत नाही. तू आपुल्या घरी उमरावतीला चारशे पानांची तयारी केली होतीस ना? त्यावेळी गोपाळराव पेठकर आणि बापटमास्तर यांचा प्रकार काय घडला ते तू आता आठव बरं? बापटाला पुत्रशोक झाला असून सुद्धा तो प्रसादाला तुझ्या घरी आला होता ना ? पेठकराचे ब्राह्मण भोजन कशाने राहिले? अरे गजानन स्वामी त्या उभयतांच्या स्वप्नांत गेले होते. त्यांनी दोघांनाही उपदेश करून प्रसादाला आणले होते. हे कसे विसरलास?

खुणेच्या गोष्टी ऐकून लक्ष्मण साशंक झाले व मनात म्हणाले, हा कोण आहे काही कळत नाही. लक्ष्मणानी त्या परमहंस संन्याशाला आदराने नमस्कार केला व तेवढ्यात लगेच तो परमहंस गुप्त झाला. मग लक्ष्मण घरी येऊन अगोदरसारखे वागूं लागले. दरवर्षी त्यांनी त्यांच्या घरी श्री गजानन महाराजांची पुण्यतिथी साजरी करायला प्रारंभ केला. माधव मार्तंड जोशी हे कळंब कसूर गावी मोजणी करायला आले होते. ते रेव्हेन्यु आँफिसर होते. त्यांचा गजानन महाराजांवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी दिवसभर मोजणीचे कामे केलीत व संध्याकाळी त्यांची शेगावास जाण्याची इच्छा झाली व मनात म्हणाले, आज गुरुवार आहे. समर्थाचे दर्शन घेऊ. त्यांनी शिपायाला दमणी तयार करण्याची आज्ञा केली व म्हणाले कि, चल आता शेगावला जाऊ व रात्री तिथंच मुक्काम करून सकाळी परत येऊ. तेव्हा शिपाई कुतुबुद्दीन हात जोडून बोलला, आभाळ भरून आलेलं दिसत आहे याचा आपण विचार करावा. मन नदीला गढूळ पाणी भरपूर आलंय म्हणून विनंती केली. त्यावर जोशी म्हणाले, अरे, आत्ताच नदीपार होऊ. जा आता दमणी तयार कर. ते ऐकून शिपाई लगेच दमणी तयार करून घेऊन आला. जोशी दमणीत बसून शेगावला जाऊं लागले. पण दमणी जशी नदीत वळविली तशीच त्या नदीला अचानक पाणी आले. बैलांना पैल तिरापर्यंत जायला सुध्दा वेळ मिळाला नाही. नदीला क्षणात मोठा पूर आला. शिपाई कुतुबुद्दीन म्हणाला, साहेब, येथेच मरण येणार ! आता काहीही उपाय उरला दिसत नाही. माधव मार्तंड जोशी सुद्धा मनातल्या मनात घाबरून गेले व करुणामयी वचनाने श्री गजानन महाराजांची प्रार्थना करू लागले व म्हणाले, हे गजानना आता तुम्हीच आमच्या प्राणांचे रक्षण करा. जीवघेण्या संकटात तुझ्याविना आम्हाला कोण त्राता आहे? पुराणात कथा ऐकली आहे की समुद्रात जहाज बुडताना संतांनी हात देऊन रक्षण केले तसेच आता तुम्हीही आम्हाला या संकटातून वाचवा व या पुरामधून आमचे रक्षण करा. ते अशी प्रार्थना करत असताना दमणीत पाणी शिरले. त्यामुळे बैल घाबरून गेले. ते पाहून जोशी शिपायास म्हणाले, तूं आता मागे हो व गजानन महाराजांचे भजन कर. आता तेच आपल्याला भवपार करतील. आता तू चिंता करू नकोस.

पुढं जोशी महाराजाना म्हणाले, समर्था तुझी सत्ता अगाध आहे. आता तुला जे वाटेल तसं तू कर. आम्हाला तार अथवा मार. असं म्हणून त्यांनी शिपायाला कासरा सोडून देण्यास सांगितले आणि दोघेही डोळे मिटून बसले. तेवढ्यात चमत्कार झाला. अशा महापुरातून दमणी निर्विघ्नपणे पैलतटावरील शेगावच्या सडकेवर जाऊन उभी राहिली. हा प्रकार पाहून उभयतांना आनंद झाला. घटकाभर रात्र झाली असताना जोशी शेगावात आले. समाधीला वंदन करून पालखीचा सोहळा पाहिला. दुसरे दिवशी जोशानी खूप दानधर्म केला. त्यांना सर्व घटना सांगितल्या व म्हणाले, मी नवस केलाय. त्याप्रित्यर्थ माझ्यासाठी तुम्ही ब्राह्मण भोजन घाला. कारण जरुरीचे काम असल्याने मला वेळ नाही. असे म्हणून जोशी निघून गेले.

खामगावला भाऊ राजाराम कवर डॉक्टर होते. त्यांची तेल्हार्‍याला बदली झाल्याने तेथे जाण्यासाठी ते खामगांवाहून सहकुटुंब निघाले होते. त्यांनी तेल्हार्‍याची गाडी करून निघण्याची तयारी केली. संध्याकाळची वेळ होती. जाण्यापूर्वी ते महाराजांचे दर्शन घ्यायला ते मठात आले. बाळाभाऊ मठाधिपती होते. ते म्हणाले, अहो माझी विनंती ऐका. तुम्ही उद्या प्रसाद घेऊन जा! आजपर्यंत कधी प्रसाद न घेता गेला नाहीत. मग आज असं विपरीत मनात का आणलंत? त्यात आज व्यतिपात आहे हे लक्षात घ्या. त्यावर कवर म्हणाले, मला घाई आहे. आज रात्री प्रसाद घेतो व मग लगेच जाईन. तुम्ही यावेळी मला नसता आग्रह करू नका. असं म्हणून झाल्यावर ते मुलांमाणसांना घेऊन दमणीत बसून तेल्हार्‍याला निघाले. सर्वत्र अंधार दाटला. त्यात चमत्कार म्हणजे गाडीवान तेल्हार्‍याचा रस्ता चुकला. कुणाकडे चौकशी करावी म्हटलं तर कुणी भेटलंही नाही. गाडी अरुंद रस्त्यावरून चालली होती. शेवटी ती एका भव्य तलावाच्या काठावर येऊन उभी राहिली. गाडीवाला म्हणाला, साहेब रस्ता चुकलाय. हे ऐकून कवराना आश्चर्य वाटले. खाली उतरून पहातात तो सर्व वेगळंच दिसलं. रागारागाने ते त्या गाडीवाल्याला म्हणाले, अरे, तू तेल्हार्‍याचा म्हणून तुझी गाडी केली आणि तूच आम्हाला असा आडमार्ग दाखवलास. तुझ्या डोळ्यांना वाट कशी काय दिसली नाही. तूच म्हणाला होतास ना, की, तू नेहमी तेल्हार्‍याला जात येत असतोस, म्हणूनच तर तुझी गाडी केली. मग आडमार्गावर गाडी कशी आणलीस तू? त्यावर गाडीवाला हात जोडून म्हणला, मला का ओरडता ? मी नेहमीच भाडे करतो. तेल्हार्‍याहून येथे येतो. वाटेल तेव्हा गाडी हाकतो. मला सर्व रस्ता माहीत आहे. बैलही कोठे इकडे तिकडे वळले नाहीत पण तलाव पाहून बावरले. कारण हा रस्ता तेल्हार्‍याचा नाही. हे सगळं ऐकल्यावर कवर मनात काय ते समजले. म्हणाले, हे केवळ महाराजांचं कृत्य आहे. मी प्रसाद घेतल्याशिवाय निघालो म्हणून माझा रस्ता चुकलाय. पण आता वाट कशी सापडणार? या घनघोर अरण्यात माझे रक्षण करण्यासाठी महाराज तुमच्याशिवाय मला कोण त्राता आहे ? ते अशी विनवणी करत असतानाच तळ्याच्या दुसर्‍या बाजूला घागरमाळांचा आवाज झाला. तो ऐकल्यावर मात्र डॉक्टराना थोडा धीर आला. ते गाडीवानाला म्हणाले, येथून रस्ता फार दूर नसावा. घागरमाळाच्या आवाजाच्या चाहुलीने गाडी पुढे हाक. कवरांचे म्हणणे ऐकून त्याने गाडी हाकली. काट्यांकुपाट्यांमधून काढून नीट रस्त्याला लावली. हमरस्ता लागल्यावर डाँक्टरांनी चौकशी केली तेव्हा समजले की, हे शेगावचेच शिवार आहे. मग डाँक्टर गाडीवानाला म्हणाले, चल शेगावी परत जाऊ. सूर्योदयाच्या वेळी कवर शेगावात आले आणि त्यांनी सर्व वृत्तांत बाळाभाऊना निवेदन केला. बाळाभाऊ म्हणाले,. हेच बरे झाले. समर्थांनी तुम्हाला व्यतिपाती जाऊ दिले नाही. आज प्रसाद ग्रहण करून उद्या तेल्हार्‍याला जा. प्रसाद कधी नाकारू नये. तुम्ही श्री गजानन भक्त आहात म्हणून तुम्हाला परत आणले.

एक रतनसा नावाचे भावसार जातीचे गृहस्थ होते. त्यांचा मुलगा दिनकर एक वर्षाचा असताना त्याला सोबणीचा रोग झाला. कोणी म्हणू लागले आता हा गेला. मोठमोठ्या वैद्यांनी उपचार केले पण काहीएक उपयोग झाला नाही. मूल काही रडायचं थांबेना. दूधपाणी घेईना आणि त्याचा तापही कमी होत नव्हता. वैद्य रतनसाना म्हणाले, आता याला काही औषध देऊ नका. हा तुमच्या हाताला लागणे अशक्य आहे. सुज्ञ मनाने नेहमी तंतोतंत विचार करावा. उगीच सागरावर पूल बांधायला जाऊं नये! हे ऐकून रतनसा ढसाढसा रडूं आलं. दिनकराचा अंतकाळ आता अगदी जवळ आला होता. दिनकराचे हातपाय गार पडले. डोळ्यातले तेज मंदावले. मनगटाला नाडी लागेनाशी झाली. शेवटी रतनसानी मनात असा विचार केला की , आता कसही करून मुलगा जाणारच आहे पण आता माझ्याजवळ शेवटचा उपाय आहे तो करून बघतो, असं म्हणून त्यांनी हातात मुलाला उचलून घेतले व महाराजांच्या पुढे नेऊन ठेवले. पुढे नवस केला की, मुलगा जर बरा झाला तर मी पांच रुपयांची शेरणी वाटीन. तुम्ही सर्वांच्या नवसाला पावता तो अनुभव मलाही येऊ द्या. माझे मूल जर तुमच्या दारी मृत झाले तर अवघ्या वर्हाडांत तुमची नाचक्की होईल. हे स्वामी गजानना या बालकावर कृपा करा. माझा मुलगा या आजारातून उठला नाही तर मी तुमच्या पायावर डोके फोडीन असा माझा निश्चय आहे. तुमच्या अमृततुल्य दृष्टीची आज माझ्या मुलावर वृष्टी करा. महापुरुषा गजानना! माझ्यावर कृपा करा. थोडावेळ गेल्यावर मूल हातापाय हालवायला लागले. नाडी ठिकाणावर आली. मूल रडू लागले ते पाहून सर्वजण आनंदीत झाले. समर्थकृपा झाल्यावर दिनकर थोड्याच दिवसांत पूर्वतत झाला. श्रध्दायुक्त नवस नक्कीच फळ देतो.

रामचंद्र पाटलांची चंद्रभागा नावाची कन्या होती. तिला लाडेगावला दिली होती. ती गरोदर असताना तिच्यावर प्रसुतीच्या वेळी दुर्धर प्रसंग आला. प्रसुतीची वेळ स्त्री जातीला फार कठीण असते. मोठ्या कष्टाने तिची प्रसूती झाली पण लगेच चंद्रभागेला ज्वर चढला. तो नवज्वर होता. पाटलांनी औषध उपचार खूप केले. सगळे डॉक्टरी उपचार करून तेवढ्यापुरते बरे वाटे पण आजार मात्र नामशेष होईना. त्यामुळे चंद्रभागा वरचेवर आजारी पडूं लागली. एकदा अकोल्याला औषधोपचार करण्यासाठी तिला नेलं. पण निरनिराळ्या वैद्यांची निरनिराळी मते पडली .पाटलानी ठरवलं की, आतां वैद्य गजानन ! तारो अथवा मारो. हिला रोज अंगारा लावावा, तीर्थ द्यावे. वडिलांची श्री गजानन महाराजांवर खूप मोठी निष्ठा होती. हळूहळू त्यांच्या मुलीला गुण येऊ लागला. ज्या मुलीला शय्येवरून उठवत नव्हते तीच पायी चालत दर्शनासाठी मठात आली, असे अंगार्‍याचे महत्त्व आहे. रामचंद्रांची पत्नी जानकाबाईंना वाताचा विकार झाला. त्यामुळे वरचेवर पोट दुखत असे पण कुठलाच उपाय चालेना. औषधाने तेवढ्यापुरतं बरं वाटायचं पण औषध संपलं की, व्याधी पूर्ववत जशीच्या तशीच व्हावयाची.असं फार दिवस चालू होतं. शेवटी तो वात डोक्यात शिरून मेंदु बिघडला. चांगलं वाईट कळायचं बंद झालं. त्यामुळे वेड्यासारखं वर्तन होत असे. कुणी म्हणायचं यांच्या मानगुटीवर भूत बसलंय, कुणी म्हणायचं रोग लागलाय , कुणी सांगायचं ही करणी आहे. औषध उपचार फार केले. जाणत्यांकडून गंडे दोरे जानकाबाईंच्या हातात बांधले. पाटील घरचे श्रीमंत असले तरी अडचणीत सापडले होते. म्हणून दांभिकांना ऊत आला. पत्नी काही बरी होईना. शेवटी त्यांनी ठरवले कि आतां माझ्यासाठी वैद्य, जाणते, देवऋषि सर्वकाही गजानन महाराजच आहेत. त्याना जस वाटेल ते करोत. ते पत्नीला म्हणाले, तूं उद्यापासून प्रातःकाळी स्नान करून मठात जाऊन समाधीला प्रदक्षिणा घाल. तिने पतीचे वचन सर्वथैव मान्य केले आणि समर्थांच्या समाधीभोवती ती प्रदक्षिणा घालू लागली. सद्गुरुरायाना दया आली आणि वातविकार बरा झाला. खर्‍या संतांची सेवा कधीच वाया जात नाही. ही गोष्ट माहीत असली तरी माणसांची संतांवर निष्ठा बसणं अशक्यच असते. समर्थांच्यानंतर बाळाभाऊ गादीवर बसले. त्यांचे काही चमत्कार झाले. हे वैशाख वद्य षष्ठीसी शेगावातच वैकुंठाला गेले. त्यानंतर नारायण गादीवर बसले. बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नांदुरे गावच्या नारायणरावांना स्वप्न पडले. गजानन महाराज त्यांच्या स्वप्नात गेले व म्हणाले हे नारायणा, भाविक जनांना रक्षण्यासाठी तू शेगांवला जा. त्याप्रमाणे नारायण शेगावला गेले. काही दिवस यांनीही अधिकार चालविला. यांची समाधि चैत्र शुध्द षष्ठीला शेगावला झाली. श्री गजानन लीलेचा पार कधीच लागायाचा नाही. अंबरींच्या चांदण्यांचा कधी हिशोब लागतो का? मी अज्ञान पामर असून मला तिळभरही बुद्धी नाही. मग ह्या लीलासागराचे वर्णन मी मूर्ख कसे करणार? त्याने जे जे वदविले ते ते मी कथित केले. इति स्वस्ति श्री दासगणूविरचित गजानन विजय ग्रंथाचा विसावा अध्याय सुफळ संपूर्ण!

- Advertisment -

ताज्या बातम्या