Friday, April 26, 2024
Homeब्लॉगस्वातंत्र्य आणि शिक्षण परस्पर पूरक !

स्वातंत्र्य आणि शिक्षण परस्पर पूरक !

उंच उंच इमारती.. शाळेला मैदान..प्रयोगशाळा..अवतीभोवतीचा भव्य दिव्य परीसर, पोहण्यासाठी तलाव..अगदी कार्पोरेट कार्यालय वाटावे अशी काचांनी नटलेल्या स्वरूपाची शाळेची इमारत होती. पालक खुश होते.

पैसे कितीही लागले तरी ते मोजण्याची तयारी होती. कारण ज्या पुढच्या पीढीसाठी पैसे कमविले जाणार होते त्या मुलांच्या भविष्यासाठी शाळा आणि शिक्षण महत्वाचे आहे हे त्याला माहित होते. त्यामुळे पालक अगदी शाळेत प्रवेश घेण्यासाठी जीवाची ओढाताण करतात. चांगल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी कष्टत राहातात, अनेक मार्गानी वशीला लावण्याचा प्रयत्न करतात.

- Advertisement -

शाळेत त्यांच्या कुटुंबासाठीचे भविष्य घडणार असते. शिक्षणाचे मोल जाणलेले असते..आणि भविष्य अधिक संपन्न करण्यासाठी शाळा महत्वाची ठरते. त्यामुळे त्यांना हव्या असलेल्या शाळेत प्रवेश मिळाल्यांने पालक खुष होते, त्यांना आनंद झाला होता. मात्र ज्या पाल्याला शाळेत शालेय आय़ुष्य काढायचे त्याला ती आवडते का नाही ? याचा विचार केला गेला नाही..शिक्षण म्हणजे नेमके काय ? हा प्रश्न आहे..भौतिक सुविधा की शिक्षक यांच्यात कशाला अधिक महत्व हवे..अलिकडे शाळा निवडतांना तेथे कार्यरत असलेल्या गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाचा विचार होताना दिसत नाही..खरंतर शिक्षणाच्या प्रक्रियेत काय महत्वाचे याचा विचार केल्याशिवाय आपल्या पाल्याला माणूस म्हणून जीवन घडविता येणार नाही.

अनेकदा पालक,शिक्षक,अभ्यासक्रम,पुस्तक लेखक, शाळा व्यवस्थापन, नियोजन, शाळास्तरावरील कार्यक्रम,सहशालेय उपक्रम यात देखील विद्यार्थ्यांना गृहित धरले जाते. त्यांना गृहित धरल्यांने त्यांना काय हवे आहे हे त्यांच्या मनातील भावभावनापेक्षा मोठयांच्या नजरेतून शाळांची निवड करण्यात येते.

मोठ्याच्या निवडीत आनंद आणि शिकणे यापेक्षा प्रतिष्ठा आणि मुलांचे व्यावसायिक, रोजगारभिमुख भविष्य म्हणून शाळांचा विचार केला जातो. मग त्यांनी निवडलेली शाळा मुलांना आवडणारी आहे की नाही…. ? शाळा मुलांना आंनंद देणारी आहे की नाही ? याचा विचार मागे पडतो.

त्यामुळे ज्याला तिथे शिकायचे आहे त्याच्या दृष्टीचा विचार करायला नको का..? जगप्रसिध्द शिक्षण तज्ज्ञ रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या वडीलांनी शाळेत घातले होते.मुळतः टागोरांचे वडील हिमालयात अनेक वर्ष होते मात्र तेथून आल्यावर त्यांनी मुंलाच्या शिक्षणांचा गंभीरपणे विचार करीत होते. आपल्या शालेय शैक्षणिक अनुभवाच्या संदर्भाने रवींद्रनाथांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.त्यात ते म्हणतात “ मी शाळेत शिकत होतो तेथील एका शिक्षकांच्या मुखी नेहमीच शिव्या असायच्या.ती गोष्ट वडिलांना कळाली.

तर त्याच दरम्यान आणखी एका शिक्षक शिक्षा करीत असल्याचे त्यांना कळले.या गोष्टीनंतर त्यांनी आपल्या मुलाला शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला.मुलाची शाळा कायमची सुटली..” त्यानंतर त्यांनी आपल्या सोबत मुलाला घेऊन हिमालय गाठले.त्या ठिकाणी औपचारिक शिक्षणापेक्षा अधिक ज्ञान देण्याचा प्रयत्न झाला. तेथे रवीद्रंनाथ अनेक भाषा, गणित, खगोलशास्त्र, त्या सह परिसर, निसर्ग वाचायला शिकले.

ते जेथे शिकत होते तेथे एक सुंदर मंदिर उभे राहील असे वडील म्हणाले होते..अखेर तेथे ज्ञानमंदिर उभे राहिले अर्थात तेच आजचे शांतीनिकेतन.शिक्षणात काय महत्वाचे आहे हे वडिलांनी ओळखले होते.त्यामुळे शिक्षण म्हणजे काय आणि त्यासाठी काय महत्वाचे हे ओळखल्यानंतर मुले बहरतात..फुलतात..त्यातून माणूस घडविला जातो हे महत्वाचे.

शिक्षण केवळ उंच उंच इमारतीच्या देखण्या रूपात घडत नाही .इमारती कार्पोरेट झाल्या आणि सिमेंटच्या इमारती उभ्या राहिल्या , तरी आपल्याला अधिक गरज आहे ती संवेदनशील आणि माणूसपणाचे वाहते झरे हदयाशी ठेऊन जीवन प्रवाहा आनंददायी करणा-या विद्यार्थ्यांची.

विज्ञान खेळातून विद्यार्थ्यांचे शिक्षण घडविणारे आय.आय़.टी.एन श्री. अरविंद गुप्ता यांना आपल्या मुलीसाठी प्राथमिक शाळेत प्रवेश घ्यायचा होता.त्या प्रवेशाकरीता शाळांचा शोध घेणे सुरू होते.अनेक शाळांमधून ते फिरत होते.मुलीला कोणती शाळा आवडते हे पाहात असतांना एका शाळेत ते पोहचले.मुख्याध्यापकांना भेटले. मुलीच्या प्रवेशा संदर्भात बोलणे केले.

त्यावेळी मुख्याध्यापक म्हणाले “ मुलीला शाळेत पाठवा..आम्ही तिचा प्रतिसाद,प्रगती पाहून तिला शाळेत प्रवेश द्यायचा की नाही हे ठरू ? ” तेव्हा गुप्ता म्हणाले “ सर, तसे नाही माझी मुलगी शाळेत शिकण्यासाठी आज थांबेल, पण तिला शाळा तेथील वातावरण,शिक्षक आवडले तरच तीला या शाळेत प्रवेश घेऊ. तिला येथे शिकायचे आहे.

तिला शाळा आवडायला हवी तरच प्रवेश..” मुलांच्या शिक्षणाबाबत पालक म्हणून किती जागृत राहायला हवे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. मुलांना काय हवे हे पालक मोठयांच्या नजरेने जे पाहातात. पालकांना जे हवे असते तेच मुलांना हवे असते का ? तर त्याचे उत्तर नाही असे येते.राष्ट्रीय अभ्यासक्रम आऱाखड्याच्या आरंभी एक गोष्ट सांगण्यात आली आहे. टागोर लिहितात “ मी लहान असतांना मला साध्यासाध्या गोष्टीपासून खेळणी तयार करण्याचे आणि स्वतःच्या कल्पनेप्रमाणे खेळ तयार करण्याचे स्वातंत्र्य मला होते.

माझ्या आनंदात माझ्या सर्व खेळगडयांचा सहभाग होता.एकत्र खेळणे हाच आनंद होता. पण एकदा मोठयांच्या व्यापारी जगातून एक भूरळ पाडणारी वस्तू आमच्या मित्राच्या हाती आली.ती जणू जिवंत वाटावी अशी मोठी खेळणी होती.त्या खेळण्याचा त्याला मोठा अभिमान वाटायला लागला.त्याचे आमच्या सोबत खेळणे तुटायला लागले.त्यांने त्याचे ते महागडे खेळणे काळजीपूर्वक आमच्यापासून दूर ठेवणे पंसत केले. ते एकमेव खेळणे आपल्याकडे आहे हे त्याला भारी वाटायचे.

त्यामुळे ज्यांच्याकडे साधी खेळणी आहे, त्यांच्यापेक्षा तो स्वतःला श्रेष्ठ समजायला लागला.ती खेळणी आमच्यापासून दूर ठेवायला लागला.त्या खेळण्यांने त्याची श्रीमंतीचे दर्शन घडले.मात्र त्या महागडयाने खेळण्याने त्याची सर्जनशील असणारी वृत्ती हिरावून घेतली.त्या आमच्या सोबत खेळतांना साध्या साध्या खेळण्यात दिसणारी आनंदी वृत्ती दिसली नाही.

श्रीमंतीने त्या बालकांच्या जीवनातील आनंद आणि सहकार्यांच्या मधील सहकार्याची भावना हिरावून घेतली होती.मुलांच्या आय़ुष्यात श्रीमंती महत्वाची नाही, तर त्यांचा आनंद महत्वाचा आहे. मुलांसाठी श्रीमंती ,गरीबी या अर्थशास्त्रातील संकल्पना आणि त्याचा परिणाम महत्वाचा नाहीत..तर माणूसपणाचे नाते आणि आंनद या पलिकडे महत्व नसते. पण आम्ही मोठी माणंस मुलांवर काही लादण्याच्या नादात आणि स्वप्न पाहाण्याचा छंदात मुलांचे जिवन हरवत जाते.

शिक्षण तर तेव्हा जास्त चांगले होते जेव्हा विद्यार्थ्यांच्या भोवती स्वातंत्र्य आहे. निसर्गाशी संवाद साधता येतो.त्यांना निसर्गाशी बोलता येते.त्यांना सहकार्याशी मुक्त संवाद साधता येतो.त्यांना खेळणी हवी असतात पण महागडया नाही तर सर्वांना मिळून एकत्रित खेळण्यात आनंद असतो. अगदी अवतीभोवती असणारे खडे खेळण्यात देखील आनंद मिळतो.

लहान वयात जेव्हा महागडया वस्तू उपलब्ध होत नाही तेव्हा मुलांना चिंचोकी, चिंध्याचा चेंडू, लाकडाची फळी, लाकडाच्या काठयांपासूनचे स्टंप पुरेसे ठरतात.फर्शीवरती खेळली जाणारे खेळ, मातीच्या वस्तू खेळण्यात देखील त्यांना आंनद मिळत असतो. त्यामुळे मुलांना अस स्वातंत्र्य देणारे,त्यांच्या भावविश्वाला समजावून घेणारे वातावरणाची गरज असते.त्याच बरोबर शिक्षकांची आशय संपन्नता,त्यांची ज्ञानाची साधना महत्वाची आहे.

टागोंराच्या वडीलांनी मुलाच्या विकासासाठी शिक्षकांच्या दोन चुकाही मान्य केल्या नाहीत.उत्तम शिक्षक असेल तर समाज उत्तम घडेल यात शंका नाही.त्यामुळे कर्मवीरांच्या शाळा झाडाखाली सुरू राहिल्या…पण त्यातून पी.जी.पाटलांसारखी माणंस घडली..निसर्गाच्या भवतालमध्ये घडलेली माणंस देशाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देत होती.त्यांनी समाज निर्मितीत महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचे आणि समाजाशी एक नाते राहिले.

समाज व राष्ट्र विकासात त्यांची भूमिका अंत्यत महत्वाची राहिली. ती शिकलेली माणंस व्यवसायात आले, पण बांधिलकी सोडली नाही..अभय बंगासारखी माणंस अखंडकाळ समाजाशी नाळ जोडून प्रामाणिकपणे काम करता आहेत.आकाशाखाली शिकलेली बाबा आमटे,बाबा आढाव,कर्मवीर भाऊराव पाटील, मधू दंडवते,यशवंतराव चव्हाण यांच्यासारखी अनेक माणंस आकाशाच्या उंचीची घडली..पण आकाशाच्या उंचीच्या सिमेंटच्या जंगलात घडणारी माणंस भिंती सारखी मुकी ..जीवंतपणा हरवलेली..हदय नसलेली..संवेदना नसलेली केवळ देखणी माणंस त्या शाळांतून निर्माण केली तर समाज मुका होईल..अंध होईल आणि एका हिंसेच्या पातळीवर उभा ठाकेल..त्यामुळे शिक्षणातून स्मार्ट माणूस घडविण्यासाठी केवळ स्मार्ट इमारती नाही तर स्मार्ट मनुष्यबळाची गरज आहे.त्यासाठी शाळांचा विचार करतांना मुलांना काय हवे आहे हे कधी जाणून घेणार की नाही.

ज्या शाळेत मुलांनी भिंतीवर शाई उडवली तर भिंत खराब होते..मुलांनी नाचत बागड चालण्याने शाळेची शिस्त बिघडते..जेथे खेळ,कला,आणि कार्यानुभव केवळ तास उरतात..जेथे केवळ पुस्तके एके पुस्तक..आणि स्पर्धा दुणे स्पर्धा उरते..त्या शाळेत जीवंत माणंस निर्माण होण्याऐवजी केवल स्पर्धेचा प्राणी तयार होण्याची शक्यता आहे..कारण माणंसासाठी शिक्षणाची साधना आणि साधनेच्या पावलाने जाणारी शिक्षक हवी असतात..त्यामुळे शाळेत कोणत्या प्रवेशित करायचा याचा निर्णय विवेकांने घेण्याची गरज आहे..कारण शाळा आणि शिक्षण आपल्या भविष्याची पाऊलवाट आहे.

– संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या