Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकव्यापार्‍याचा शेतकर्‍याला लाखोंचा गंडा

व्यापार्‍याचा शेतकर्‍याला लाखोंचा गंडा

लासलगाव। वार्ताहर

तालुक्यातील गोंदेगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी भाऊसाहेब कांगणे यांची अमितकुमार अर्जुनदेव लुधियाना (पंजाब) या व्यापार्‍याने 6 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शेतकरी कांगणे यांनी व्यापार्‍याविरोधात लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

द्राक्ष हंगामात परराज्यातील व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी जिल्ह्यात येत विश्वास संपादन करून द्राक्ष उत्पादकांना गंडा घालून जात असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. गोंदेगाव येथील शेतकरी भाऊसाहेब कांगणे यांनी दोन एकर मध्ये द्राक्षबाग लावलेला होता. त्यात थॉमसन एक्सपोर्ट क्वलिटीची द्राक्ष तयार केलेली होती.

शेतातील द्राक्ष पुर्ण तयार झाल्याने कांगणे द्राक्ष विक्री साठी मार्केटमध्ये विकण्याचा प्रयत्न करीत असतांना विंचूर येथील सागर ज्ञानेश्वर राऊत व द्राक्ष व्यापारी अमितकुमार अर्जुनदेव (रा. लुधियाना, पंजाब) हे शेतात आले. त्यावेळी द्राक्षाची पूर्ण पाहणी करून सदर द्राक्ष 29 रू. प्रती किलो या दराने घेण्याचे ठरविले. त्यानुसार व्यापारी अमितकुमार अर्जुनदेव यांचेशी 248 क्विंटल द्राक्षाचा 7 लाख 18 हजार रुपयांचा सौदा झाला. व्यापारी अमितकुमार अर्जुनदेव याने या व्यवहारापोटी 50 हजार रुपये रोख दिले.

मात्र उर्वरित 6 लाख 70 हजार रुपयांची शेतकर्‍याने मागणी केली असता व्यापारी अमितकुमार उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्यास फोन केला असता त्याचा फोन बंद येऊ लागला. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लासलगाव पोलीस ठाण्यात भादवी 406, 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या