Thursday, April 25, 2024
Homeनगरटाकळीभान येथे कृषी सेवा केंद्रात शेतकर्‍यांची फसवणूक

टाकळीभान येथे कृषी सेवा केंद्रात शेतकर्‍यांची फसवणूक

टाकळीभान (वार्ताहर) – खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने शेतकर्‍यांची खते खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. येथील कृषी सेवा केंद्रचालक मात्र शेतकर्‍यांची फसवणुक करुन शेतकर्‍यांना एक प्रकारचा माल देतात तर सबसिडी लाटण्यासाठी अनुदानपात्र खताचे बिल ऑनलाईन टाकुन सरकारचीही फसवणुक करीत असल्याचा प्रकार नुकताच एका शेतकर्‍यामुळे उघडकिस आला आहे. तालुका कृषी अधिकार्‍यांनी याबाबत सखोल चौकशी करुन संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

खरीप हंगाम तोंडावर आल्याने व ऐनवेळी खते उपलब्ध होत नसल्याने शेतकरी कृषी सेवा केंद्रावर चकरा मारताना दिसत आहेत. मात्र टंचाई आसल्याचे सांगुन वाढीव दराने खत विक्री केली जात आहे. शेतकर्‍याने मागितलेल्या खताची टंचाई आहे, रॅक लागला नाही असे कारण प्रत्येकाला सांगितले जाते व शेतकर्‍याने वाढीव दर दिल्यास त्याला चोरी छुपके खत दिले जाते. युरीया खताचा गेल्या काही दिवसांपासुन तुटवडा आसल्याचे सांगुन जादा भावाने विक्री केली जात आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासुन रासायनिक खतांच्या किंमती वाढणार असल्याच्या चर्चेने साठेबाजी होवुन कृत्रीम टंचाई निर्माण करण्यात आली होती. रासायनिक खतावरील भाववाढ मागे घेण्यासाठी शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरण्याच्या हलचाली सुरु केल्या होत्या. केंद्र सरकारने यात मध्यस्ती करीत खतांच्या किंमती जैसे थे ठेवल्या होत्या तर काही रासायनिक खतांसाठी सबसिडी देण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने खतांचे दर निश्‍चित केलेले असले तरी टंचाईच्या नावाखाली चढ्या भावाने रासायनिक खतांची विक्री करुन शेतकर्‍यांची आर्थिक लुट केली जात आहे.

शेतकर्‍यांची लुट करीत असतानाच येथील कृषी सेवा केंद्र चालक सरकारचीही लुट करीत असल्याचे बोलले जात आहे. शेतकर्‍यांनी खरेदी केलेले रासायनिक खताचे बिल वेगळे व सबसिडीसाठी ऑनलाईन बिल केलेले वेगळे दाखवले जाते. सबसिडीसाठी ऑनलाईन केलेल्या बिलाचा संदेश शेतकर्‍यांच्या मोबाईलवर येत आसला तरी शेतकरी त्याचा फारसा विचार करीत नाहीत. कृषीसेवा चालकाचा मात्र त्यात फायदा होतो.

याबाबत आज येथील एका जागृत शेतकर्‍याने आवाज उठवल्याने ही लपवाछपवी समोर आली. याबाबत येथील कृषी सहाय्यक प्रियंका शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. अशा स्वरुपाच्या दोन कृषी सेवा केंद्राबाबत तक्रारी आल्या असुन याबाबत चौकशी करुन तालुका कृषी आधिकारी यांना आहावाल देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

येथील कृषी सेवा केंद्र चालकांकडुन लुट होत असल्याच्या तक्रारी दररोज येत आहेत. टंचाई भासवुन चढ्या भावाने खते विकली जात आहेत. करोनामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना नागवण्याचे काम केले जात असेल तर ते खपवुन घेतले जाणार नाही. सबसिडी नसलेले खत देवुन सबसिडी असलेल्या खताचे ऑनलाईन बिले केली जात आहेत. वास्तविक सबसिडी शेतकर्‍यांना मिळणे अपेक्षित असताना त्यावर डल्ला मारण्याचे काम केले जात असेल तर या प्रश्‍नावर आवाज उठवला जाईल. कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकर्‍यांना मदत करण्याचे धोरण ठेवावे.

– मयुर पटारे, ग्रा. प. सदस्य,

प्रदेश उपाध्यक्ष (राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस)

- Advertisment -

ताज्या बातम्या