Friday, April 26, 2024
Homeनगरचारचाकी व दुचाकी वाहने चोरणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

चारचाकी व दुचाकी वाहने चोरणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अहमदनगर, जालना, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यांतून चारचाकी, दुचाकी वाहने चोरणारी टोळी नगर स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 14 लाख 60 हजार रुपये किमतीच्या वाहनांसह मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

सादिक इब्राहिम पठाण, (रा.काझीबाबा रोड, सुलतान नगर, ता. श्रीरामपूर) हे गाडी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे ओळखीचे जनार्दन रामचंद्र बाबर रा. भिंगार (नगर) यांनी त्यांची महिंद्रा बोलेरो मालवाहतूक गाडी क्र. एमएच 16/एवाय / 4790 ही विक्री करण्यासाठी गाडीचे कागदपत्रांसह फिर्यादी यांचेकडे दिली होती. सदरची पिकअप फिर्यादीने त्यांच्या श्रीरामपूर येथील कार्यालयाच्या समोर उभी केली असता दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 777/2021 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबर्‍याकडून माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा संजय रावसाहेब चव्हाण रा. ब्राम्हणगाव, ता. श्रीरामपूर याने व त्याच्या साथीदारांनी केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज गोसावी, पोलीस नाईक संतोष लोंढे, दीपक शिंदे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र घुंगासे, रणजित जाधव, सागर ससाणे, जालिंदर माने, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे, पोलीस नाईक भरत बुधंवत आदींनी सापळा लावून आरोपी संजय रावसाहेब चव्हाण, (वय 30), मूळ रा. रांजणी, ता. शेवगाव हल्ली रा. ब्राम्हणगांव, ता. श्रीरामपूर यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने वर नमुद गुन्ह्यातील 3,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल महिंद्रा बोलेरो मालवाहतूक गाडी क्र. एमएच/16/एवाय/ 4790 काढून दिल्याने ती जप्त करण्यात आलेली आहे.

आरोपीने अशा प्रकारचे कोठे-कोठे गुन्हे केलेले आहेत याबाबत कसून चौकशी केली असता सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर, एक डेल कंपनीचा मॉनिटर. एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल, शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक काळे रंगाचा लिनिओ कॉम्प्युटर. दुसर्‍या गुन्ह्यात शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल, विनानंबर, एक काळे रंगाचा लिनिओ कॉम्प्युटर. नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल. अंबड, जिल्हा जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 बुलेट. पैठण, जिल्हा औरंगाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक पांढर्‍या रंगाचा महिंद्रा बोलेरो पिकअप असा या गुन्ह्यातील एकूण 14 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्र, नाशिकचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, श्रीरामपूर पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके, शेवगावचे पोलीस उपाधिक्षक सुदर्शन मुंडे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या