Wednesday, April 24, 2024
Homeनगरनागवडे कारखान्यात बोगस ऊस दाखवत अध्यक्षांनी काढली कोट्यवधीची बिले

नागवडे कारखान्यात बोगस ऊस दाखवत अध्यक्षांनी काढली कोट्यवधीची बिले

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

स्व. नागवडे सहकार साखर कारखान्यात ज्यांना शेत जमीन नाही, शेतात ऊस नाही, उसाची नोंद नसताना देखील कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांच्या तसेच नातेवाईक आणि कर्मचारी यांच्या नावाने बोगस ऊसाच्या नोंदी दाखवून कोट्यवधी रुपयांची उसाची बिले काढली असल्याचा आरोप कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर यांनी लेखी पुरावे देत पत्रकार परिषदेत केला.

- Advertisement -

श्रीगोंदा येथील कुकडी शासकीय विश्राम गृह याठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, काँगेसचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील भोसले, जिजाबापू शिंदे, संजय जामदार, प्रशांत दरेकर, अजित जामदार, अ‍ॅड.बाळासाहेब काकडे, अ‍ॅड.बापूसाहेब भोस, अनिल ठवाळ हे उपस्थित होते.

यावेळी मगर यांनी सांगितले की राजेंद्र नागवडे हे सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या उसाच्या वजनात काटा मारून नुकसान केले तर स्वतः बोगस शेकडो टन उसाचे कोट्यवधी रुपयांची बिले कारखान्यातून काढली हे पैसे गेले कोठे याचा हिशेब नागवडे यांनी सभासदांना द्यावा असे सांगून त्यांनी पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले.तसेच नागवडे यांनी रॉ शुगर तसेच व्हाईट शुगर विक्रीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून सर्वसामान्य सभासदांचे प्रपंच उद्ध्वस्त केले.

आता काय नागवडे राजीनामा देणार का ? शेलार

माझ्या मालकीचे खाजगी कारखाने तसेच कंपन्या असतील तर मी स्वतः राजीनामा देईल असे नागवडे म्हणाले होते. मग पुणे येथील श्री लक्ष्मी नरसिंह शुगर, ग्रामलाईफ फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, उमंग ऍग्रो गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, श्री लक्ष्मी नरसिंह स्पायनिंग प्रायव्हेट लिमिटेड, श्रीकांत अ‍ॅग्रोटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, हायक्यू व्हेनच्युअरस प्रायव्हेट लिमिटेड या 6 खाजगी कंपन्यांपैकी 5 त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांच्या नावे तर एक कंपनी राजेंद्र नागवडे यांच्या नावावर असल्याचे शेलार यांनी सांगत राजेंद्र नागवडे नागवडे सहकारी साखर कारखान्याचा राजीनामा देणार का? असा सवाल पंचायत समिती सदस्य आणि संचालक पदाचा राजीनामा दिलेले अण्णासाहेब शेलार यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या