Thursday, April 25, 2024
Homeनगरवर्ष सहा महिन्यातून उगवणार्‍या नेत्यांनी ‘अशोक’ची उठाठेव वगळता शेतकर्‍यांसाठी काय केले?

वर्ष सहा महिन्यातून उगवणार्‍या नेत्यांनी ‘अशोक’ची उठाठेव वगळता शेतकर्‍यांसाठी काय केले?

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आमच्या राजकीय कारकिर्दीत पाटपाणी, खंडकरी शेतकरी तसेच शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही आंदोलने केली, चळवळी केल्या, लाठ्याकाठ्या खाल्ल्या, प्रसंगी तुरुंगातही गेलो. तसे पावसाळी छत्रीसारख्या वर्ष सहा महिन्यातून उगविणार्‍या शेतकर्‍यांचे प्रतिनिधी व हितरक्षक नेत्यांनी अशोकची उठाठेव व कुरापती वगळता शेतकर्‍यांसाठी काय केले? असा सवाल माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी केला.

- Advertisement -

अशोक साखर कारखाना निवडणुकीतील लोकसेवा विकास आघाडीच्या प्रचारसभेत श्री. मुरकुटे बोलत होते. श्री. मुरकुटे म्हणाले की, एरवी शहरात ऐश आरामात राहायचे आणि वर्ष सहा महिन्यातून सवडीनुसार श्रीरामपूरला यायचे आणि आम्हीच शेतकर्‍यांचे कैवारी आहोत, असा आव आणायचा ही विरोधी नेत्यांची निती आहे. तालुक्यातील जनतेच्या वा शेतकर्‍यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हायला ज्यांना फुरसत मिळत नाही. ते आता अशोकच्या निवडणुकीत शेतकर्‍यांचे हितरक्षक असल्याचा आव आणित आहे. आम्ही सन 1980 पासून राजकारणात आहोत. तेव्हापासून आम्ही तालुक्यातील जनतेच्या सुख-दुःखाशी समरस झालो आहोत.

अशोक कारखान्याच्या कारभारावर बोलण्याचा यांना अधिकार नाही. ऊस भावाबाबत खोटीनाटी आकडेवारी सांगून दिशाभूल करायची आणि साप-साप म्हणत भुई थोपटायची ही काही शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची निती आहे. त्यांच्या या गोबेल्स नितीला अशोकचे सभासद भिक घालणार नाही, असा विश्वास श्री. मुरकुटे यांनी व्यक्त केला.

जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे म्हणाले की, अशोक कारखान्यामुळे श्रीरामपूरची बाजारपेठ टिकून आहे. पूर्वी हरेगाव, टिळकनगर व अशोकनगर असे तीन कारखाने तालुक्यात होते. त्यातील हरेगाव व टिळकनगर येथील कारखाने कायमस्वरुपी बंद पडले. याचा प्रतिकुल परिणाम श्रीरामपूरच्या बाजारपेठेवर झाला. आता केवळ अशोक कारखाना हाच एकमेव मोठा उद्योग तालुक्यात अस्तित्वात आहे. हे आर्थिक केंद्र टिकले पाहिजे असे आमचे मत आहे.

शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचीन गुजर म्हणाले, माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी गेली 35 वर्षे अशोक कारखाना समर्थपणे सांभाळला आहे. शिस्त आणि व्यवहारीपणा तसेच प्रशासनावर पकड हे श्री. मुरकुटे यांचे वैशिष्ट्य आहे. संस्था कशा चालवाव्यत याचा दांडगा अनुभव त्यांचेकडे आहे. त्यामुळे भविष्यातही कारखान्याची सूत्रे त्यांचेकडेच राहिली पाहिजेत, हे ध्यानात घेवून आम्ही राजकीय मतभेदांना तिलांजली देत एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सदरच्या सभांना माजी आ. भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे सचिन बडधे, गिरीधर आसने, शेतकरी संघटनेचे सुभाष पटारे, सारंगधर आसने, डॉ. नितीन आसने, भाऊसाहेब बांद्रे, राजेंद्र पाऊलबुध्दे, शांताराम तुवर, सुधाकर दौलतराव पवार, विठ्ठलराव पवार, अंबादास ढोकचौळे, बाबासाहेब ढोकचौळे, किसनतात्या बडाख, ज्ञानदेव बडाख, नानासाहेब तनपुरे, जयंतराव कवडे, सुरेश कवडे, संजय सर्जेराव कवडे, चंद्रकांत कांदळकर, रामनाथ कवडे, प्रताप कवडे, प्रा. बाबासाहेब पवार, अनिल देशमुख, बाळासाहेब कुलकर्णी, अर्जुनराव खरात, वसंतराव शेरकर, सुरेश मुदगुले आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या