Video : माजी आमदार कदमांचे उपोषण ‘या’ आश्वासनानंतर तूर्तास स्थगित

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

निफाड तालुक्यात (Niphad) सहकार विभागाने राजकीय दबावाखाली राजकीय मतांच्या फायद्यासाठी शासकीय नियम धाब्यावर बसवून नोंदणी केलेल्या १० नवीन विविध कार्यकारी सोसायट्यांची नोंदणी रद्द करावी…

त्या सोसायट्यांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने (NDCC Bank) केलेले बेकायदेशीर कर्जवाटपात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी सहकार विभागाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ विभागीय सहनिबंधक कार्यालय नाशिक येथे निफाडचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांनी शिवसैनिकांसह आज साखळी उपोषण केले.

खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या उपस्थितीत विभागीय निबंधक ज्योती लाटकर (Jyoti Latkar), जिल्हा निबंधक सतीश खरे (Satish Khare) यांनी अनिल कदम यांना आठ दिवसात कारवाईचे आश्वासन दिल्याने साखळी उपोषण (Agitation) तूर्तास स्थगित करण्यात आले…

तालुक्यात सुरू असलेल्या सोसायटी निवडणूकिमध्ये स्थानिक राजकीय दबावाखाली पात्र असलेल्या सभासदांना डावलण्यात आले आहे. जुन्या संस्थेतही सभासद असणाऱ्या अपात्र सभासदांना मात्र निवडणुकीसाठी (Election) पात्र ठरविण्यात आले आहे. निफाड तालुक्यात सहकार विभागाच्या यंत्रणेचा लोकप्रतिनिधींकडून सर्रास दुरुपयोग केला जात आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबत अनिल कदम (Anil Kadam) यांच्या तक्रारीची दखल घेऊन सखोल चौकशीचे निर्देश देऊनही सहकार विभाग कारवाईस टाळाटाळ करत होते. त्यामुळे शुक्रवारी शिवसैनिक आक्रमक झाले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय आप्पा करंजकर, शहरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड यांनी अनिल कदम यांनी भेट घेत नाशिक शहर शिवसेनेच्यावतीने उपोषणास पाठिंबा दिला.

यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजी, अनिल कदम आगे बढो अशी घोषणाबाजी करत विभागीय सहनिबंधक कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. नाशिक शहर पोलिसांची (Police) यावेळी खंडू बोडके पाटील, प्रकाश महाले, सभापती आशिष बागुल यांच्यासह शिवसैनिकांशी बाचाबाची झाली.

त्यानंतर विशेष राखीव दलाच्या तुकडीसह प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहनिबंधक लाटकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन विभागीय सहनिबंधक लाटकर यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर अनिल कदम यांनी उपोषण स्थगित केले असल्याची घोषणा सायंकाळी केली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, ज्येष्ठ नेते भास्कर बनकर, अनिल कुंदे, ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील, निफाडचे नगराध्यक्ष विक्रम रंधवे, उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, तालुकाप्रमुख सुधीर कराड, पंडित आहेर, गोकूळ गिते, सभापती आशिष गोटू बागुल, किरण लभडे, जिप सदस्य दीपक शिरसाठ, दिलीप नाना मोरे, नगरसेवक बंटी तिदमे, मुकुंद होळकर, देवदत्त कापसे, सुभाष होळकर, उत्तम गडाख, संदीप टरले, शरद नाठे, संजय कुंदे, जगन आगळे, रतन गाजरे, आशिष मोगल, शिवा सुरासे, शहाजी राजोळे, शंकर संगमनेरे, सोमनाथ पानगव्हाणे, प्रशांत पगार, प्रकाश महाले आदींसह शिवसैनिक या साखळी उपोषणात सहभागी झाले होते.

अनागोंदी कारभाराबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाईस टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे उपोषनाचे हत्यार वापरावे लागले. विभागीय निबंधक ज्योती लाटकर यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत संबंधितांवर आठ दिवसात कारवाईचे आश्वासन दिल्याने उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले. यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

-अनिल कदम, माजी आमदार निफाड

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *