Thursday, April 25, 2024
Homeराजकीयखोट्या तक्रारीव्दारे सत्ताधार्‍यांकडून अडकविण्याचे सूडाचे राजकारण

खोट्या तक्रारीव्दारे सत्ताधार्‍यांकडून अडकविण्याचे सूडाचे राजकारण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

सत्ताधारी पक्षाकडून सुडाचे राजकारण करुन खोट्या तक्रार करुन माझ्यासह माझ्या निकटवर्तीय रामेश्वर नाईक असो की इतरांना अडकविण्याचा घाणेरडा प्रकार सुरु आहे.

- Advertisement -

तीन वर्षानंतर जो प्रकार घडलाच नाही, त्या प्रकाराबाबत आता तक्रार दाखल होते, हे आश्चर्य आहे. विशेष म्हणजे याबाबत कुणी माहिती द्यायला तयार नाही, तसेच दाखल झालेल्या गुन्ह्याची फिर्याद सुध्दा द्यायला तयार नाही, याला काय म्हणाव असा प्रश्न असून याबाबत आपण मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागतिली असून या गुुन्ह्यात कारवाईसह चौकशीला सात तारखेपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे, असा खुलासा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जीएम फाउंडेशनच्या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेव्दारे केला.

तीन वर्षानंतर गंभीर स्वरुपाचा गुन्हा हे संशयास्पद

पत्रकार परिषदेप्रसंगी आमदार सुरेश भोळे, विधान परिषद आमदार चंदू पटेल, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी आ. गिरीश महाजन झाले की, तीन वर्षापूर्वीची घटना निंभोरा येथे गुन्ह्याच्या स्वरूपात दाखल होणे आश्चर्यकारक आहे. गेल्या वर्षी आपण मंत्री असतांना अ‍ॅड. विजय भास्कर पाटील हे आपल्याला भेटले होते.

अगदी आम्ही तीन-चार वेळेस एकत्र जेवण देखील केले आहे. यामुळे इतक्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात येणे ही बाब सर्व संशयास्पद आहे.

यामुळे हायकोर्टात अपील दाखल केले असून यात कोर्टाने तपास करून मगच गुन्हा दाखल करावा असे निर्देश दिले आहेत. 7 जानेवारीपर्यंत न्यायालयाने दिलासा दिला असल्याची माहिती आ. महाजन यांनी याप्रसंगी दिली.

सर्व सखोल चौकशी व्हावी अशी अपेक्षा

या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आ. गिरीश महाजन यांनी केली आहे. यात अगदी मोबाईलच्या लोकेशनसह सर्व सखोल चौकशी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आजवर जळगाव जिल्ह्यात अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नाहीत. अशा प्रकारचे गलीच्छ राजकारण कधीही केले नाही.

मात्र आता तीन वर्षानंतर गुन्हे दाखल करण्याची पध्दत चुकीची आहे. नूतन मराठा या संस्थेशी आमचे काहीही देणेघेणे नाही. मात्र यात आम्हाला अडकवण्यात आले असून यात पडद्यामागे कुणी तरी कलाकार असल्याचा संशय गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

सूत्रधाराला शोधून काढणार

आ. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, अ‍ॅड. विजय भास्कर पाटील हे मध्यंतरी जेलमध्ये होते. त्यांच्यावर कलम-307 सारखा गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले.

या प्रकरणी आपण पूर्ण खोलवर जाणार असून अ‍ॅड. विजय पाटील यांच्या मागचा बोलविता धनी कोण, पडद्यामागचे कलाकार कोण, याप्रमाणे यातील सूत्रधाराला शोधून काढणार असल्याचा इशारा देखील आ. गिरीश महाजन यांनी दिला.

जिल्ह्यातूनच सूडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सत्ता येते आणि जाते. आज महाविकास आघाडीची सत्ता असली तरी उद्या स्थिती बदलू शकते असे संकेतही त्यांनी दिले.

आमच्याकडेही अनेक गोष्टी ; जशास तसे उत्तर देवू

आम्हीही सत्तेेत होतो. मात्र इतके घाणेरडे राजकारण केले नाही. मात्र आता सत्ताधार्‍यांकडून खोट्या तक्रारी करुन माझ्यासह रामेश्वर नाईक यांच्यासह माझ्या सोबतच्यांना अडकविण्याचा प्रकार सुरु आहे.

त्यामुळे हे सर्व उद्योग सुरु आहेत. आमच्या कडे देखील बरेच काही असल्याचे आ. महाजन म्हणाले. मात्र आपण खोटे काहीही करणार नसून खरेच करणार असल्याची पुष्टी देखील त्यांनी दिली. यशावकाश सर्व समोर येईल. जशास तसं उत्तर देणार असल्याचेही महाजन यावेळी म्हणाले.

सुनील झंवर सर्वांचेच निकटवर्तीय

बीएचआर प्रकरणात सुनील झंवर यांचे नाव येत असून ते तुमचे निकटवर्तीय असल्याचा आरोप होत आहे. याबाबत विचारले असता, महाजन म्हणाले की, बीएचआर प्रकरणाची माझा काडीचाही संबंध नाही.

मी कधी कर्ज घेतले, मी बीएचआरचा संचालक नाही अशा एक ना अनेक बाबी आहेत. तसेच सुनील झंवर यांच्यासोबत माझेच नाही तर सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध हे सर्वश्रूत आहे, अशी कबुली देखील त्यांनी दिली.

सुनील झंवर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न होत असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

गृहमंत्र्याच्या दबावानंतर गुन्हा दाखल

तीन दिवसांपासून दाखल गुन्ह्याबाबत फिर्याद सुध्दा मिळत नाही. काहीच माहिती मिळत नाही, तीन वर्षानंतर गुन्हा दाखल होतो, तो सुध्दा निंभोरा येथे, यानंतर पुण्याला शून्य क्रमांकाने वर्ग होतो या सर्व बाबी संशयास्पद आहे.

याबाबत मुंबईवरुन दबाव होता, वरिष्ठांकडून दबाव होता, गृहमंत्र्यांकडून दबाव होता, ह्या गोष्टींची माहिती निंभोरा पोलीस ठाण्यातून मिळाली आहे.

याबाबत गृहमंत्र्यांशी बोललो असता, गृहमंत्र्यांनीही संबंधित घटना तीन वर्षापूर्वी घडली असेे माहित नसल्याचे सांगितले, असेही यावेळी गिरीश महाजन म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या