Friday, April 26, 2024
Homeब्लॉगकणखर क्रिकेटपटू काळाने हिरावला

कणखर क्रिकेटपटू काळाने हिरावला

भारताचे भरवंशाचे माजी सलामीवीर आणि सध्याच्या उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री चेतन चौहान कोरोनाचा आणखी एक दुःखद बळी ठरले आहेत.

गेले महिनाभर त्यांनी करोनाशी तीव्र संघर्ष केला पण ते मृत्यूला टाळू शकले नाहीत.आजच्या पिढीला कदाचित त्यांचे नाव माहीत नसेलही.पण सत्तर आणि ऐशी च्या दशकातलं क्रिकेट समरसून पाहणाऱ्या आमच्या पिढीला चेतन चौहान आणि त्याचा पराक्रम तोंडपाठ आहे.

- Advertisement -

मूलतः दिल्लीचा असलेला हा खेळाडू वडिलांच्या नोकरीमुळे पुण्यात आला.वाडिया कॉलेज मध्ये शिकला.कमल भांडारकर यांच्यासारखे धुरंधर त्याला प्रशिक्षक म्हणून लाभले.पुणे विद्यापीठाकडून क्रिकेट खेळताना रोहिंगटन बारिया करंडक स्पर्धेत व मग विजय हजारे स्पर्धेत त्याने धावांच्या राशी ओतल्या.

नंतर अर्थात रणजी ट्रॉफी साठी महाराष्ट्रकडून निवड झाली .तिथेही या सलामी वीराने धावांचा पाऊस पाडला.1969 मध्ये मुंबई कसोटीत चेतनची निवड झाली.आपल्या पहिल्या डावात पहिल्या पंचवीस मिनिटात त्याला भोपळाही फोडता येईना.

आमच्यासारखे त्याचे चाहते बेचैन होऊ लागले होते.शेवटी ब्रूस टेलरला सणसणीत स्क्वेअर कट मारून आणि मग पुढच्याच चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकून चेतन चौहानने आपल्या कसोटीतल्या धावांचा श्रीगणेशा केला.मात्र दोन कसोटीनंतर त्याला सुट्टी दिली गेली.

पुन्हा घेतलं तीन वर्षांनी आणि लगेच एखाद दुसऱ्या कसोटीची पाने तोंडाला पुसून त्याला मोठया सुट्टीवर पाठवले गेले.उण्यापुऱ्या पाच वर्षात हा सलामीवीर चार पाच कसोटी सामने खेळला असेल.मग चेतनने पुणे सोडलं आणि आपलं माहेर गाठलं.योगायोग बघा ,दिल्लीत त्यांचं नशीब फळफळलं .त्याला कसोटीत पुन्हा संधी मिळाली.मग मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही.सुनील गावसकर त्यावेळी टॉप गियर मध्ये होता.

त्याच्या बरोबर चेतनची जोडी जमली.या दोघांनी मिळून तीन हजारच्यांवर धावा केल्या.ओव्हल कसोटीत त्यांनी द्विशतकी भागीदारी केली.भारताने तो सामना जवळजवळ खिशात घातला होता.पाकिस्तानला बऱ्याच वर्षांनी संघ गेला तेंव्हा त्या मालिकेत सलामीला या दोघांनी 192 धावांची भागीदारी केली.

पाकिस्तानी पंचांनी त्यांच्या संघाला मदतीचे बोट नाही तर पूर्ण हात दिला.हे दोन्ही आघाडी वीर अंपायरचीत झाले.पुढच्या सामन्यात त्यांनी पुन्हा शतकी भागीदारी केली .या दोघांनी मिळून कसोटीत दहा शतकी भागीदारी केल्या.

पुढे ऑस्ट्रेलियन दौरा आला.80 चा हा दौरा खूप गाजला.या मालिकेत चेतन चौहान तुफानी खेळला.पहिली कसोटी हुकल्यावर त्याने सातत्याने खेळ केला.पर्थला 85,धावा केल्या पण अडलेंडला मात्र त्याचं शतक तीन धावांनी हु कले. कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा काढूनही शतकाची पाटी कोरी राहिलेला तो एकमेव कसोटी पटू….

याच मालिकेत मेलबर्नला, दुसऱ्या डावात,शतकी भागीदारीनंतर सुनील गावस्करला चुकीचे पायचीत दिल्यावर , गोलंदाज लिलीने भारतीय कर्णधाराला काहीतरी चिमटा काढला.

भडकलेल्या सुनीलने तंबूकडे परतताना चेतनला मैदान सोडायचा इशारा केला.सुदैवाने मॅनेजर विंग कमांडर दुरराणी नी मैदानात येऊन चेतनला परत जायला सांगितले आणि पुढचं रामायण टळलं.

हा सामना भारतानं नंतर जिंकला हे आवर्जून सांगायला हवं.आश्चर्य म्हणजे कर्णधारपेक्षा दुपटीने जास्त धाव काढूनही, लिली, पास्को, हॉग आणि थॉमसन चा यशस्वी सामना करूनही, या मालिकेनंतर, चौहानला वगळण्यात आले.हा चेतन चौहान साठी चारशे चाळीस वोल्ट चा शोक होता.

खरं तर नक्की काय झालं हे आजही गुलदस्त्यात आहे.हे गावस्करचे राजकारण आहे अशी आधी चर्चा होती.पण आपल्या सर्वात यशस्वी जोडीदाराला सुनील अशी ट्रीटमेंट देईल हे संभवत नाही.मला वाटत चौहानच्या जागी श्रीकांतला संघात घेतलं गेलं. हा उत्तर दक्षिण वाद तर नव्हता?

चेतन चौहान खूप आकर्षक फलंदाज नव्हता.पण त्याचा डिफेन्स उत्तम होता.. त्या काळात आघाडीच्या फलंदाजाकडून याच तंत्रज्ञानाची अपेक्षा असायची.मात्र तो जिगरबाज फलंदाज होता.त्या काळात आपल्याकडे वेगवान गोलंदाजाशी दोन हात करणारे लढवय्या फलंदाज कमीच होते.चेतन कणखर होता.तो हार मानायचा नाही.मला वाटत हेल्मेटचा वापर करणारा चेतन पहिलाच भारयीय फलंदाज असावा.

चेतन चौहान सुरुवातीला बी सी सी आय शी आणि नंतर दिल्ली क्रिकेट असोसिएशन शी संलग्न राहिला.दिल्ली च फिरोजशहा कोटलाचे पिच हा नेहमी वादाचा विषय राहिला आहे.चेतन चौहानने बाऊन्स चांगला रहावा असे पिच बनवण्यात खूप मेहनत घेतली.काही वर्षांपूर्वी नवदीप सैनी या तेज गोलंदाजावरून त्यांचं आणि कर्णधार गौतम गंभीरच बरंच वाजलं होतं..

मधल्या काळात त्यांनी राजकारणात भाग घेतला, बीजेपीकडून दोनदा खासदार झाले.सध्या योगी आदित्य नाथांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्रीही होते.पण सारं काही आलबेल चाललं असताना त्यांना कोविद 19 झाला.

या खतरनाक साथीच्या आजाराशी चेतन चौहान ,लिली थोमोशी लढावं तितक्याच जोमाने लढले.दुर्दैवाने त्यांना विकेट गमवावी लागली …!त्यांच्या निधनाने भारताने एक उत्तम खेळाडू , चांगला प्रशासक आणि जाणकार नेता गमावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या