Thursday, April 25, 2024
Homeनगरवनरक्षक शहीद किनकर यांच्यावर श्रीक्षेत्र ताहाराबादला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

वनरक्षक शहीद किनकर यांच्यावर श्रीक्षेत्र ताहाराबादला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ताहाराबाद |वार्ताहर| Taharabad

श्रीरामपूर येथील मोरगे वस्तीत धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याला जेरबंद करताना राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील भूमिपुत्र वनविभागाचे वनरक्षक लक्ष्मण गणपत किनकर यांना वीरमरण आले. काल श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे दुपारी चार वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात शहीद किनकर यांना साश्रूनयनांनी ग्रामस्थांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस व वनविभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

- Advertisement -

रविवार दि. 5 डिसेंबर रोजी बिबट्याने धुमाकूळ घातला. त्याला जेरबंद करण्यासाठी राहुरी वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी, श्रीरामपूर विभागाचे पोलीस पथक व स्थानिक नागरिकांनी जीवाची बाजी लावत इंजेक्शनच्याद्वारे त्याला बेशुद्ध केले. बिबट्या चार तासानंतर बेशुद्ध झाला. बिबट्याच्या धुमाकुळीत एक पोलीस कर्मचारी, एक वनकर्मचारी, एक शिक्षक, दोन विद्यार्थी व तीन नागरिक जखमी झाले होते. त्यामध्ये जखमी झालेले ताहाराबाद गावचे भूमिपुत्र लक्ष्मण गणपत किनकर यांचे अहमदनगर येथे उपचारादरम्यान र दि. 8 डिसेंबर रोजी निधन झाले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी राहुरी वनविभागात लक्ष्मण किनकर नेहमीच आघाडीवर असत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

यावेळी नाशिक येथील वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे, अहमदनगर वन विभागाचे उपवनसंरक्षक सुवर्णा माने, कोपरगाव वनक्षेत्रपाल श्रीमती सोनवणे, राहुरी वनक्षेत्रपाल सचिन गायकवाड, वन परिमंडळ अधिकारी भगवान परदेशी, श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, अमोल भनगडे, नारायण झावरे आदींनी त्यांना आदरांजली समर्पित केली. यावेळी अहमदनगर वनविभाग, अहमदनगर पोलीस विभाग अधिकारी, कर्मचारी व ताहाराबाद ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या