पावसाच्या तडाख्याने शेवगावसह इतर भागात पुरमय स्थिती

jalgaon-digital
2 Min Read

शेवगाव | तालुका प्रतिनिधी

काल झालेल्या पावसामुळे ओढे-नदया पातळी ओलांडुन वाहु लागल्याने नदया लगतच्या परिसरात वेगाने पाणी घुसुन पुरमय स्थिती निर्माण झाली. चोहीकडे पाणीच पाणी झाले. काही घरे, अनेक जनावरे, घरांतील साहित्य या पुरात वाहुन जाऊन मोठे नुकसान झाले आहे.

नदयांना अचानक एवढा मोठा पुर प्रथमच आल्याचे नागरिकांनी सांगितले. जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात सलग तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. पहिल्या दोन दिवसांत पाऊस न झाल्याने नागरिक निश्चिंत होते. मात्र काल रात्रीपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू झाला. डोंगरभागांत पावसाचे प्रमाण अधिक होते.

हवामान खात्याने आज अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पाण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी नदीकाठी राहु नये. उंच टेकडी व घरावरती जावून रहावे. पाण्यात अडकलेल्या जनावरांना मोकळे सोडून द्यावे.

अर्चना पागिरे, तहसीलदार, शेवगाव.

पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील डोंगरभागांत काल झालेल्या पावसामुळे शेवगाव तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे. आखेगाव, खरडगाव, वरूर, भगूर, वडुले, ठाकूर पिंपळगाव, बोधेगाव या गावांत पूर स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील नंदिनी, चांदणी, वटफळी या तीनही नद्यांना पूर आला आहे. नदी पात्रापासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरापर्यंत पाण्याने शिरकाव केला आहे. या तीनही नद्यांचा संगम वरूर गावात होतो. तेथे तर हनुमान मंदिर, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असा गावाचा परिसरात नदीचे पाणी पोचले आहे. नदीच्या पाण्याला वेग असल्याने नागरिकांचे प्राण संकटात आहे.

पावसाचे पाणी अचानक आल्याने नदीकाठचे आखेगाव येथील २५ कुटूंब तर वरूर येथील म्हस्के वस्तीवरील काही कुटुंबे पाण्यामध्ये अडकले आहेत. काहींची तर जनावरे वाहून गेली. ही सर्व कुटुंब भयभीत झाली आहेत. शेकडो हेक्टर मधील वाढलेली उस, कपाशी, तुर, कांदा आदी पीके पाण्यात गेली असून घरांचे ही मोठे नुकसान झाले आहे. त्यांना वाचविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड-पागिरे यांनी पैठण येथून बोट आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *