Tuesday, May 14, 2024
Homeनगरअठरा महिन्यांच्या ब्रेकनंतर रविवारी शिर्डी विमानतळावरून उड्डाणे सुरू होणार

अठरा महिन्यांच्या ब्रेकनंतर रविवारी शिर्डी विमानतळावरून उड्डाणे सुरू होणार

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

गेल्या दिड वर्षापासून करोनामुळे बंद असलेले काकडी येथील शिर्डी विमानतळ रविवारी 10 तारखेपासून सुरू होणार असल्याच्या माहितीस शिर्डी विमानतळाचे संचालक सुशिलकुमार श्रीवास्तव यांनी दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

एप्रिल 2020 मध्ये करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. तेव्हापासून हे विमानतळ बंद होते. साईमंदीरही बंद असल्याने साईभक्त शिर्डीकडे येत नव्हते. आता मंदिरेही खुली होणार असल्याने विमानसेवा सुरू होणे गरजेचे होते. त्यादृष्टीने विमानतळ विकास प्राधिकरणाने शिर्डी विमानतळाची विमाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई याठिकाणची विमानसेवा स्पाईसजेट व इंडिगो एअरलाईन सुरू करणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता दिल्लीवरून शिर्डी विमानतळावर विमान येणार आहे तर साडेबारा वाजता दिल्लीला जाणार आहे.दुपारी अडीच वाजता हैदराबादवरून शिर्डी विमानतळावर विमान येणार असून तीन वाजता पुन्हा हैदराबादला जाणार आहे.

तर दुपारी चार वाजता चेन्नईवरून विमान शिर्डी विमानतळावर येणार असून साडेचार वाजता पुन्हा चेन्नईला जाणार आहे. विमानतळ बंद असल्याचा काळात याठिकाणी नाईटलँडींगची कामे करण्यात आली. त्यात काही अडचणी आहेत. कार्गो सेवा सुरू करण्याच्या हालचालीही येथून सुरू आहेत. मध्यंतरी त्यासाठी अनेक बैठका पार पडल्या. करोनामुळे अनेक अडचणी आल्या. देशात विमानतळ सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासून सर्वाधिक पंसती मिळालेले हे विमानतळ आहे.

मात्र याठिकाणी अजून अत्याधुनिक सुविधा वाढविणे आवश्यक आहे. येथे दृष्यमानतेची अनेक वेळेस अडचण निर्माण होत होती. दृष्यमानतेमुळे मागे अनेक वेळेस विमानउड्डाणे रद्द झाली होती. अठरा महिन्यांनंतर विमानसेवा सुरू होत असल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच काकडीतील वाहनधारकांनाही रोजगार सुरू होईल. लवकरात लवकर पूर्वी सुरू असलेली सर्व 28 विमानसेवा या विमानतळावरून सुरू व्हावी अशी साईभक्तांसह परीसराची अपेक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या