Saturday, April 27, 2024
Homeनगरमहामार्गावरील वाहनांमधून ज्वलनशील पदार्थांची चोरी; काळ्याबाजारात विक्री

महामार्गावरील वाहनांमधून ज्वलनशील पदार्थांची चोरी; काळ्याबाजारात विक्री

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महामार्गावरून गॅस, डिझेल, ऑईल तसेच अ‍ॅल्युमिनियम व स्टिल वाहतुक करणार्‍या वाहनातून माल चोरून तो काळ्या बाजारात विक्री करणार्‍या आठ जणांना पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतले. दोघे जण पसार झाले आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने मंगळवारी पहाटे अहमदनगर- पुणे महामार्गावरील वागुंडे बुद्रूक (ता. पारनेर) शिवारात हॉटेल सौरभच्या पाठीमागे ही कारवाई केली. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्या आरोपींकडून 20 लाख 70 हजार 460 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गॅस टाक्या, वाहने, देशी-विदेशी दारू व इतर पदार्थांचा समावेश आहे.

- Advertisement -

नंदकिशोर पांडुरंग गाडीलकर (वय 50), पांडुरंग रंभाजी गाडीलकर (वय 65 दोघे रा. वागुंडे बुद्रूक), समसुल्ला सराफत उल्ला खान (वय 36 रा. सुपा), अम्रीतलाल मुन्नीलाल गुप्ता (वय 42), शिवम अम्रीतलाल गुप्ता (वय 20), इस्तीखार खान शरीफ खान (वय 21), निखील अनिल गाडीलकर (वय 24, सर्व रा. वागुंडे बुद्रूक), संजय सुभाष पवार (वय 23 रा. सोनवडी ता. दौंड, जि. पुणे), मदनलाल, देवा (पुर्ण नाव, पत्ता माहित नाही) (फरार) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांच्या पथकातील अधिकारी, अंमलदारांनी ही कारवाई केली. पकडलेल्या व्यक्ती या संगनमताने स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी अहमदनगर-पुणे महामार्गावरून जाणार्‍या गॅस टँकर, डिझेल टँकर, ऑईल टँकर, अ‍ॅल्युमिनियम तसेच स्टिल वाहतुक करणारे वाहनांच्या चालकांशी संगनमत करून सदर वाहने हायवे रोडचे बाजूला सौरभ हॉटेलच्या पाठीमागे घेऊन जात होते. तेथे टँकर व वाहनांमधून गैरकायदेशीर ज्वलनशील पदार्थाची चोरी करून ते काळ्या बाजारात विक्री करण्याचे उद्देशाने साठवणुक करून ठेवली होती. निरीक्षक रोहोम यांच्या पथकाने कारवाई करून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

पांढरीपूल परिसरातही असाच उद्योग

महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांमधून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक केली जाते. वाहतूकीदरम्यान चालकांशी संगनमत करून मालाची चोरी करायची व तो माल काळ्या बाजारात विक्री करण्याचा उद्योग महामार्गाच्या कडेला सुरू आहे. यातून वाहन चालकांना दोन पैसे मिळता. असाच प्रकार अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरीपुल शिवारात सुरू असल्याची माहिती आहे. स्थानिक पोलिसांचा याला आशिर्वाद आहे. त्यांच्याकडून येथे कारवाई होत नाही. यामुळे विशेष पथकाने येथे कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या