Independence Day : नगरमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

jalgaon-digital
4 Min Read

अहमदनगर | Ahmednagar

विविध स्टार्ट अप योजनांद्वारे महाराष्ट्र राज्याला देशामध्ये अग्रगण्य राज्य करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेला नाग‍रिकांनी साथ द्यावी आणि आपला सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त येथील पोलीस परेड ग्राऊंडवर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते उत्साहपूर्वक वातावरण ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हयातील स्वातंत्र सैनिक, शहिद सैनिकांचे कुटूंबीय, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर, महानगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित, स्थानिक लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

महसुल मंत्री विखे पाटील यांनी सुरुवातीला उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, स्वातंत्र्याचा 75 वर्षांचा कालखंड खुप मोठा आहे. या स्वातंत्र्य लढयात अनेक महापुरुषांचे योगदान लाभले आहे. अहमदनगर जिल्हयाचे स्वातंत्र्य लढयात लक्षणीय योगदान असून येथील भूईकोट किल्ला त्याचा साक्षीदार आहे. विविध उपक्रमांद्वारे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ या संकल्पनेतून बलशाली भारताची निर्मिती होणार आहे. पंतप्रधानांच्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाने संपूर्ण देश मंत्रमुग्ध झाला असून नागरिकांमध्ये चैतन्य आणि ऊर्जा निर्माण झाली आहे. सर्व घरांवर डौलाने फडकणारा भारतीय ध्वज बघून ‘हर मन तिरंगा’ अशी भावना निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.

गत काळात आलेल्या कोविड संकटात अनेक व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे आपण अनुभवले आहे. उद्योग, रोजगार, व्यापार, शैक्षणिक संस्था, आरोग्य विभाग आणि जनतेला या संकटाचा सामना करावा लागला. या संकटात जिल्हा प्रशासनाबरोबरच आरोग्य सेविका, आशा सेविका आणि आरोग्य दूत यांनी उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या कार्याचा मंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी गौरव केला. कोविड संकट पुन्हा येऊ यासाठी केंद्र शासनाने मोफत बुस्टर डोस उपलब्ध करुन दिला आहे. प्रत्येक नागरिकाने राष्ट्रीय कर्तव्याच्या जाणिवेतून बुस्टर डोस घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या समारंभात पोलीस परेडची पहाणी करुन त्यांनी मानवंदना स्विकारली. जिल्हा व पोलीस प्रशासनातील विविध अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन त्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला व शुभेच्छा दिल्या. पोलीस परेड संचलनात पोलीस अधीक्षक कार्यालय, महिला पोलीस पथक, होमगार्ड, पोलीस बँड सहभागी झाले होते. कार्यक्रमाला शहरातील नागरीक, युवक-युवती, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

भूईकोट किल्याला भेट व पहाणी

अहमदनगर जिल्हयाचे स्वातंत्र्य लढयात लक्षणीय योगदानाचे प्रतिक असलेल्या येथील भूईकोट किल्‍ल्याला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. भूईकोट किल्ला परिसरात पर्यटनवृध्दीसाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे आणि सैन्यदलातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

स्वातंत्र दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *