Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशचिंता वाढली! लंडनहून भारतात आलेले ५ प्रवासी करोनाबाधित

चिंता वाढली! लंडनहून भारतात आलेले ५ प्रवासी करोनाबाधित

दिल्ली । Delhi

ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. दरम्यान,

- Advertisement -

सोमवारी रात्री लंडनहून दिल्ली विमानतळावर आगमन झालेल्या विमानातील २६६ प्रवाश्यांपैकी ५ प्रवाशांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये करोनाचा घातक विषाणू सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बातमी भारताची चिंता वाढवणारी आहे.

ब्रिटनमध्ये करोना व्हायरसची नवी प्रजाती आढळून आल्याने जगातील सर्व देशांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. करोना व्हायरसची नवी प्रजाती ब्रिटनमध्ये आढळली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये करोना महामारी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी मान्य केले आहे.

करोना व्हायरसची नवी प्रजाती आढळल्यामुळे जगभरात तर्क-वितर्क लावले जात आहेत. तो किती घातक असावा?, त्याच्या प्रसाराची क्षमता अशी अशावी?, याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. याविषयी बोलताना बीबीसीचे खास आरोग्यविषयक पत्रकार जेम्स लॅलेगर यांनी अधिक माहिती दिली आहे. ‘नव्या कोरोना व्हायरसला समजून घेण्यासाठी कोरोना व्हायरसमध्ये झालेले बदल समजून घ्यावे लागतील. व्हायरसमध्ये झालेला बदल हा स्वाभाविक आहे. जास्त संक्रमणासाठी कोणताही व्हायरस स्व:तला बदलून घेत असतो. तसेच कोरोना व्हयरसच्या बाबतीत झाले आहे,’ असे लॅलेगर यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लागू

ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (21 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात आज २२ डिसेंबर २०२० पासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. करोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना भारतात बंदी

ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार सापडला आहे. त्यामुळे युनायटेड किंग्डममधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये करोनाचं नवं पण अतिशय धोकादायक स्वरुप समोर आलं आहे. कोरोनाच्या या नवीन प्रकाराचा भारतात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून युनायटेड किंगडमहून भारतात येणाऱ्या सगळ्या विमानांना २२ डिसेंबर रोजी रात्री ११.५९ पासून ते ३१ डिसेंबर रात्री ११.५९ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. २२ डिसेंबरपर्यंत विमानं युकेहून मुंबई किंवा भारतात ज्या ठिकाणी येतील त्यातील प्रवाशांना करोना चाचणी करणं आवश्यक असणार आहे. विमानतळांवर युकेहून येणाऱ्या प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात येणार आहे असं केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या