Friday, May 10, 2024
Homeनगरपहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांचा शाळांना थंड प्रतिसाद

पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांचा शाळांना थंड प्रतिसाद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारच्या सुचनेनूसार गेल्या आठवड्यात सोमवारपासून (दि.23) जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या.

- Advertisement -

मात्र, पहिल्या आठ दिवसांत विद्यार्थी आणि पालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने शाळांचे वर्ग रिकामेच असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात नववी ते बारावी असे 2 लाख 84 हजार विद्यार्थी असताना पहिल्या आठवड्यात केवळ 9 हजार 43 विद्यार्थी शाळेत आले. तर 1 हजार 209 शाळांपैकी केवळ 315 शाळा सुरू झाल्या.

करोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शासनाने दिवाळीनंतर 23 नोव्हेंबरला नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे शिक्षकांची करोना चाचणी, शाळांचे निजंर्तुकीकरण अशी सर्व तयारी शिक्षण विभागाने केली. परंतु, प्रत्यक्षात शाळांना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळतांना दिसत नाही. पहिल्या आठ दिवसांत 23 हजार 344 पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी संमतीपत्र भरून दिले आहेत.

नगर जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत एकूण 1 हजार 209 शाळा आहेत. त्यातील केवळ 315 शाळा पहिल्या आठवड्यात सुरू झाल्या. हे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे. दरम्यान, जिल्ह्यात 1209 शाळांवर सुमारे 10 हजार शिक्षक व 5 हजार 965 शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

त्यापैकी 7 हजार शिक्षकांची करोना चाचणी झाली असून त्यात 70 शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. महापालिका हद्दीत नववी ते बारावीच्या 81 शाळा असून महापालिका हद्दीत 31 शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये 9 ते 12 वीचे 28 हजार 584 विद्यार्थी आहेत. त्यापैकी केवळ 1 हजार 701 विद्यार्थी पहिल्या दिवशी आले.

पहिल्या आवड्यात 23 हजार 344 संमतीपत्र

जिल्ह्यात 2 लाख 85 हजार विद्यार्थी असताना पहिल्या दिवशी केवळ 11 हजार 412 विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र लिहून दिले. तर पहिल्या आठवड्यात हा आकडा 23 हजार 344 झाला आहे. त्यापैकीही केवळ 9 हजार 43 विद्यार्थीच पहिल्या आठवड्यात शाळेत आले. संमतीपत्र भरून देणार्‍या पालकांत राहुरी 203, संगमनेर 3 हजार 745, पारनेर 1 हजार 459, पाथर्डी 1 हजार 27, राहाता 918, शेवगाव 2 हजार 85, श्रीगोंदा 489, श्रीरामपूर 1 हजार 321, अकोले 1 हजार 610, नगर 2 हजार 897, नेवासा 2 हजार 232, जामखेड 919, कर्जत 1 हजार 327, कोपरगाव 312 आणि नगर मनपा 2 हजार 790 असे आहेत.

तालुकानिहाय सुरू झालेल्या शाळा

पारनेर 19, पाथर्डी 17, राहाता 11, राहुरी 7, संगमनेर 12, शेवगाव 25, श्रीगोंदा 9, श्रीरामपूर 21, अकोले 18, नगर 46, नेवासा 66, जामखेड 17, कर्जत 8, कोपरगाव 8 आणि नगर मनपा 31 शाळा.

करोना बाधित शिक्षक

अकोले 3, जामखेड 2, कर्जत 1, कोपरगाव 3, मनपा 14, नगर 2, नेवासा 1, पारनेर 5, पाथर्डी 2, राहाता 14, राहुरी 5, संगमनेर 8, शेवगाव 6, श्रीगोंदा 2 आणि श्रीरामपूर 2 असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या