स्वच्छतेच्या नावाखाली आर्थिक हेराफेरी

jalgaon-digital
2 Min Read

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

स्वच्छतेच्या नावाखाली कर्जत नगर पंचायतमध्ये आर्थिक हेराफेरी सुरू असल्याची टीका आदित्य क्षीरसागर यांनी केली आहे. क्षीरसागर यांनी माहितीच्या अधिकारामध्ये घेतलेल्या माहितीत नगर पंचायतमध्ये स्वच्छतेच्या खर्चाच्या नावाखाली अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार करत आहेत.

क्षीसागर यांच्या माहितीनुसार 2016 ला कर्जत नगर पंचायतची स्थापना झाली. शहरातील सार्वजनिक शौचालय व मुतार्‍या यांची संख्या व त्यांच्या साफसफाईसाठी लागणारा मासिक खर्च प्रती महिना सुमारे 14 ते 15 लाख रुपये दाखवण्यात आला आहे. यात शौचालय व मुतार्‍याची दररोज साफसफाईसाठी प्रति महिना 85 हजार ते एक लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. यातही शहरातील शौचालय व मुतार्‍यांची दिवसातून दोन वेळा स्वच्छता केली असल्याचे दाखवले आहे. बस स्थानकावरची शौचालय जे एसटीच्या मालकीचे आहे त्यावर देखील नियमितपणे नगरपंचायत खर्च करत असल्याचे दाखविण्यात आले आहे.

दुसरीकडे प्रत्यक्ष कर्जत शहरातील सार्वजनिक शौचालय व मुतार्‍या यांची पाहणी केली तर असे आढळून आले आहे की अनेक शौचालयांमध्ये झाडे व झुडूपे उगवली आहेत. तसेच दारूच्या बाटल्या, माती असे वर्षानुवर्षे पडून आहेत. तर मुख्याधिकारी आणि लेखापाल यांनी प्रति महिना 85 हजार रुपये हे शौचालय साफ करण्यासाठी कसे खर्च केले. अशा पद्धतीने दरमहा निधी खर्च केला जात होता, तर माहितीच्या अधिकारात माहिती मागणी केल्यानंतर नगर पंचायतकडून काही खर्चामध्ये दोन महिन्यांत कपात केली आहे.

मग त्या दोन महिन्यांत स्वच्छतेचा खर्च कमी कसा झाला हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शहरातील कोणत्या शौचालय व मुतार्‍या यांची नगर पंचायत स्वच्छता करते असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. सफाई केली असे भासवून सामान्यांच्या पैशाच्या गैरवापर अधिकारी यांच्याकडून झाल्याचे आढळून आले आहे. भविष्यात पंचायतच्या अधिकार्‍यांचे आणखी गैरप्रकार समोर आणणार असल्याचे क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *