Saturday, April 27, 2024
Homeनगरवित्त आयोगाचा निधी मिळाला, पण खर्च करता येईना !

वित्त आयोगाचा निधी मिळाला, पण खर्च करता येईना !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारकडून 15 व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायत खात्यात जमा झाला. त्यावर ग्रामपंचायतीने आराखडा तयार करून कामेही केली. परंतु प्रत्यक्ष ठेकेदाराचे बिल अदा करायची वेळ आली तर ते पैसेच काढता होईनात. जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटेना म्हणून अखेरचा मार्ग म्हणून ग्रामपंचायत सदस्यांना आंदोलनाचा मार्ग धरावा लागला. शेंडेवाडी (ता.संगमनेर) ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांवर ही वेळ आली आहे.

- Advertisement -

शेंडेवाडीचे सरपंच, सर्व सदस्य, तसेच ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू केले आहे. पदाधिकार्‍यांनी निवेदनात म्हटले आहे, शेंडेवाडी ग्रामपंचायतची स्थापना नोव्हेंबर 2019 मध्ये झाली असून निवडणूक होऊन ग्रामपंचायत कार्यकारिणीने 11 फेब्रवारी 2021 रोजी पदभार घेतला. गेल्या दोन वर्षात ग्रामपंचायतीने लोकसहभागातून किंवा अन्य निधीमधून चांगली कामे केली.

गाव एक विचाराचे असल्याने विकासाच्यादृष्टीने सर्व सदस्य, ग्रामस्थ सर्वांना बरोबर घेऊन कामे करत आहे. अशाच 15 व्या वित्त आयोग योजनेमधून ग्रामपंचायतीच्या खात्यात दोन वर्षाची रक्कम 14 लाख 59 हजार 308 रूपये जमा झाली. त्यामुळे रितसर त्याचा आराखडा मंजूर करून त्यानुसार चार कामे पूर्णदेखील झाली. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही रक्कम पीएफएमएसद्वारे वितरित करता येत नाही.

संगमनेर पंचायत समितीद्वारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, परंतु समाधान झाले नाही. आज होईल, उद्या होईल असे उत्तर मिळाले. अखेर सरपंचासह, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी मिळून प्रश्न मार्गी लागेपर्यंत जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी या पदाधिकार्‍यांची काल सकाळी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार होत आहे. याबाबत दिल्लीला एनआयसीच्या कार्यालयाशी बोललो आहे. लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी दिला. मात्र, आंदोलनकर्ते आंदोलनावर ठाम होते.

60 ग्रामपंचायतीमध्ये अडचण

वित्त आयोगाचा आलेला निधी ग्रामपंचायमतींच्या खात्यावर आहे. मात्र, तो तांत्रिक कारणामुळे काढता येत नसल्याने राज्यातील 60 ग्रामपंचायतींच पदाधिकारी त्रास आहेत. नगर जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार सुरू असून नव्याने उदयास आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या