Friday, April 26, 2024
Homeनगरअखेर मान्सून आला..नगरकरांना दिलासा

अखेर मान्सून आला..नगरकरांना दिलासा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. काल नगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच पाऊस न झाल्याने रखडलेल्या पेरण्यांना जोर येणार आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर पहायला मिळणार आहे. 10 जुलै रोजी नगर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisement -

मासूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर मान्सूनही जिल्ह्यात दाखल झाला. पण त्यानंतर पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. कारण अनेक शेतकर्‍यांनी दैवाच्या हवाल्यावर कापूर, मका, सोयाबीनची पेरणी केली. पण त्यानंतर पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. तसेच अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या. तर काही ठिकाणी पेरणी झाल्या. तेथील पिकांनी माना टाकायला सुरूवात केली होती. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. अशातच जिल्ह्याच्या विविध भागात काल सकाळपासून ढगाळ वातावरण होते.

दुपारनंतर अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस सुरू होता. पावसाने सुखद धक्का दिला. सर्वत्र पाऊस कोसळत असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

श्रीरामपूर शहर व परिसरात दुपारी 4.30 वाजेपासून पाऊस कोसळत होता. संगमनेरात केवळ भुरभुर झाली. कोपरगावात रात्री 9.15 वाजता पावसास सुरूवात झाली होती. अकोलेच्या काही भागात पावसाने हजरी लावली. राहुरी फॅक्टरी, देवळालीत सरी कोसळल्या.राहात्यातील वाकडी भागात जोरदार पाऋस झाला. पण अन्य भागात रिमझीम सुरू होती. नेवाशातील भेंडा, कुकाणा परिसरात रात्री 9.15 वाजता मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. सोनई परिसरात रिमझीम झाली. नगर शहरात दुपारी चारनंतर दमदार पाऊस झाला.

या पावसामुळे शहरात अनेक भाग जलमय झाला. तालुक्यात अनेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. पारनेर तालुक्यात सुपा आणि परिसारातील गावात, आळकुटी, पारनेर शहर या ठिकाणी तर बुधवारी काही भागात दमदार पाऊस झाला होता. श्रीगोंदा तालुक्यात दुपारी चारनंतर पावसाला सुरूवात झाली. तालुक्यात साधारणपणे 20 ते 25 दिवसानंतर पाऊस झाल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. सायंकाळी उशीरापर्यंत पावसाचे प्रमाण टिकून होते. कर्जत तालुक्यात सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान सर्व दूर पाऊस झाला. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या चिंता काही प्रमाणात कमी होणार असून खरीप पिकांना जीवदान मिळाणार आहे. शेवगाव तालुक्यात सव्वा पाच ते सहा वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यानंतर रात्री आठ वाजता तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला.

हवामान खात्याने 12 जुलै पर्यंत संपूर्ण राज्यभरात पाऊस बरसणार असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच दक्षिण कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शनिवार 10 जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 12 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट

10 जुलै – रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट

रायगड, नाशिक, अहमदनगर, जळगाव, विदर्भातील काही जिल्हे आणि पुण्याला यलो अलर्ट

11 जुलै -रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट

रायगड, पुणे, सातारा, ठाण्याला यलो अलर्ट

12 जुलै-रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट

दरम्यान, भंडारदरा वार्ताहराने कळविले की, भंडारदर्‍यासह पाणलोटात सकाळपासूनच उकाडा जावणत होता. दुपारनंतर येथे पावसास सुरूवात झाली. 4 वाजेनंतर जोरदार सरी कोसळत होत्या. भंडारदरात या पावसाची नोंद 13 मिमी झाली. पाणलोटातही जोर होता. पावसाचा जोर असाच टिकून राहिल्यास आज धरणात नवीन पाण्याची आवक सुरू होणार आहे. या पावसामुळे भाताची रोपे तयार असून लागवडीच्या कामाला वेग आला आहे.

कोतूळ येथील वार्ताहराने कळविले की, गेल्या दहा दिवसांपासून मुळा पाणलोटातून पाऊस गायब झाला होता. पण आता काल पुन्हा मान्सून सक्रिय झाल्याने सर्वांना हायसे वाटले आहे. हरिश्चंद्र गड, आंबित व अन्य भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याने आता मुळा नदीतील पाणी वाढू लागले आहे. या नदीवरील आंबित, पिंपळगाव खांड हे धरण भरले असल्याने आता मुळा नदीचे पाणी धरणात जमा होऊ लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या