Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रसंध्याकाळी चार नंतरही चित्रीकरणाला परवानगी

संध्याकाळी चार नंतरही चित्रीकरणाला परवानगी

मुंबई। प्रतिनिधी Mumbai

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा( Corona Second Wave ) जोर हळूहळू कमी होत असताना राज्य सरकारने ( State Govt Of Maharashtra)चित्रपट निर्मात्यांना ( film producers )आरोग्य विषयक नियम पाळून संध्याकाळी चार नंतर चित्रीकरण ( Filming) सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पोलिसांवर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी प्रत्येक निर्मात्यांचे चित्रीकरणाचे वेळापत्रक, चित्रीकरण ठिकाण आणि वेळा याबाबतची माहिती निर्मात्यांकडून मागवून घ्यावी. एखाद्या अधिकाऱ्यावर समन्वयाची जबाबदारी टाकून व्यवस्थित आणि नियमांची काळजी घेत असल्याची खात्री करून परवानगी द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी शनिवारी यासंदर्भात दिले.

चित्रपट निर्मात्यांची सर्वात मोठी संस्था असलेल्या प्रोड्युसर्स गिल्डच्या पदाधिकाऱ्यांशी ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या कोरोनाविषयक निर्देशांचे पुरेपूर पालन करून चित्रीकरण पार पडले जाईल, अशी ग्वाही दिली. गिल्डच्या वतीने सायंकाळी चार नंतरही चित्रीकरण करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.

त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण करोनाविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे. यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही, असे स्पष्ट केले. मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ, वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा. आपल्या पथकातील कलाकार आणि लोकांची नियमित कोरोना तपासणी करावी तसेच लसीकरण होईल हे पाहावे, अशा सूचनाही दिल्या.

निर्बंध टाकून तुम्हाला अडविणे आम्हालाही आवडत नाही.पण महारष्ट्र आणि केरळसह देशातील इतर काही राज्यांमधून कोरोनाचा संसर्ग अजूनही आहे. संरक्षित अशा बायो बबलची व्यवस्था करूनही काही क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमादरम्यान संसर्ग झालेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आपण पूर्णपणे बाहेर आलो नसून जगातील इतर देशात परत तिसरी लाट उसळल्याचे दिसते. त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेत राहणे आवश्यक आहे, असे ठाकरे म्हणाले.

निर्बंध कायम न ठेवता कोरोना परिस्थितीची पाहणी करून टप्प्याटप्प्याने, सावधपणे, आणि सुरक्षितरित्या ते उठविण्याबाबत राज्य सरकार पाउले टाकत आहे. पण यासाठी सर्वांचे मोठे सहकार्य लागणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीत प्रोड्युसर गिल्डचे रितेश सिधवानी, स्तुती रामचंद्र, मधु भोजवानी, राकेश मेहरा, नितीन आहुजा हे सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे सुबोध भावे, नागराज मंजुळे, रवी जाधव यांनीही बैठकीत सहभागी होऊन सूचना केल्या. आदेश बांदेकर यांनी बैठकीचे सूत्रसंचलन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या