Tuesday, April 23, 2024
Homeनगरखत विक्रेत्यांवर कारवाईसाठी तालुकानिहाय तपासणी पथके

खत विक्रेत्यांवर कारवाईसाठी तालुकानिहाय तपासणी पथके

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात युरिया खताचे प्रमाणापेक्षा जास्त खरेदी केलेल्या खरेदीदारांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर व जादा युरिया पुरवठा करणार्‍या विक्रेत्यांविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुकानिहाय तपासणी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते यांनी दिली आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीची मासिक आढावा सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी पार पडली. त्यावेळी जिल्ह्यातील पीक पेरणी, परिस्थिती, पर्जन्यमान तसेच बियाणे तक्रारींवर केलेली कार्यवाही तसेच रासायनिक खते मागणी व पुरवठा याबाबत तालुकानिहाय आढावा घेण्यात आला.

जिल्हा परिषदेने स्थापन केलेल्या तपासणी पथकांमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी, पंचायत समिती यांचा समावेश आहे. तपासणीत आढळून आलेल्या अनियमिततेबाबत खत (नियंत्रण) आदेश,1985 व जिवनावश्यक वस्तू कायदा, 1955 नुसार कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पथकास देण्यात आल्या आहेत.

तसेच तपासणी पथकांनी काय कारवाई केली, याबाबतचा अहवाल केंद्र शासनास सादर होणार आहे. त्यामुळे त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याच्या सूचना सभापती काशीनाथ दाते यांनी सर्व उपस्थित कृषी अधिकारी किंवा विस्तार अधिकारी (कृषी) यांना आजच्या बैठकीत दिल्या आहेत.

जिल्ह्यात वेळेवर झालेल्या व चांगल्या पावसामुळे खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. तसेच कोव्हिड 19च्या प्रादुर्भावामुळे हंगामाच्या मध्यास युरिया खताची काही प्रमाणात कमतरता भासली होती. तथापि सद्यस्थितीत युरीया खताचा पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. खरीप हंगामाकरिता जिह्यासाठी युरीया खताची 1,22,838 मे. टनाची मागणी नोंदवण्यात आली होती.

खताचे आवंटन मंजूर

कृषी विभागाकडून 79,420 मे. टन महिनावार आवंटन मंजूर करण्यात येऊन ऑगस्ट 2020 अखेर 74,030 मे. टन पुरवठा होणे अपेक्षित होते. त्यापैकी 54,260 मे. टन पुरवठा झाला असून या सप्ताहअखेर 6,350 मे. टन पुरवठा करण्याचे निर्देश खत कंपनीला देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या