Thursday, April 25, 2024
Homeनगरदारुचे अड्डे चालवण्यासाठी कर्जत तालुक्यात बेमाप वृक्षतोड

दारुचे अड्डे चालवण्यासाठी कर्जत तालुक्यात बेमाप वृक्षतोड

कर्जत (प्रतिनिधी)

कर्जत तालुक्यात गावठी दारुची निर्मिती करुन विक्री करण्याच्या सपाटा लावलेला आहे. तालुक्यातील 20 ते 25 गावांमध्ये दारुचे अड्डे आजही खुलेआम सुरु आहेत. तालुक्यात दारूचा महापूर वाहू लागला असतानाही प्रशासन बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.

- Advertisement -

दारुच्या भट्ट्या चालवण्यासाठी दररोज कित्येक टन लाकडाचा वापर केला जात आहे. हे लाकूड मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड केली जात आहे. यातून पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे.

दारुचे अड्डे चालवण्यासाठी लागणारे लाकूड हे प्रामुख्याने वनक्षेत्रामध्ये वृक्षतोड करून मिळवले जात आहे. हे लाकूड मिळवण्यासाठी मोठमोठ्या झाडांची अहोरात्र कत्तल केली जात आहे. तोडलेल्या झाडांचे लाकूड रात्रीतून बाहेर काढून भट्टीजवळ आणून वाळवले जाते. नंतर ते भट्टी चालवण्यासाठी इंधन म्हणून वापरले जाते.

पुणे वन्यजीव विभागाअंतर्गत कर्जत तालुक्यात शेकडो एकर वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र तालुक्याच्या विविध भागात विखुरलेले आहे. रेहेकुरी काळवीट अभयारण्य कार्यालयातून हे वनक्षेत्र जोपासले जाते. मात्र सध्या या वनक्षेत्रातूनच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. दारुभट्टी चालक हे मजूर पाठवून वृक्षतोड करून घेत जाते. कुळधरण, दूरगाव, धालवडी, राक्षसवाडी भागातील जंगलातून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरु आहे.

राज्य उत्पादन शुल्क, वनविभाग व इतर प्रशासकीय विभागांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात हे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. गावठी दारु निर्मिती, खरेदी व विक्रीच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. अनेक वर्षे जोपासलेली झाडे दारू भट्ट्या चालवण्यासाठी  तोडली जात असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. अधिकार्‍यांनी या प्रश्‍नाची गांभीर्याने दखल घेऊन ठोस कारवाया करण्याची गरज आहे. मात्र शासकीय कर्मचारी व अधिकारी हे हप्तेखोरीत गुंतल्याने या कारवाया निव्वळ फार्स ठरत असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या