Thursday, April 25, 2024
Homeनगरचिमुकलीचा खून करून पित्याने केली आत्महत्या

चिमुकलीचा खून करून पित्याने केली आत्महत्या

राहुरी (प्रतिनिधी) –

अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला पिकांचा घास निसर्गाने हिरावून घेतला. शेतीतून उत्पन्नच मिळाले नाही. आता पुढील पीक करायच कसं?

- Advertisement -

सोसायटीचे कर्ज फेडायचे कसे? त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील अनिल दिनकर पाळंदे या तरूण शेतकर्‍याने आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. तर याचवेळी त्यांची तीन वर्षाची चिमुकली मुलगीही मृतावस्थेत पलंगावर आढळून आली. या घटनेमुळे राहुरी तालुक्याला मोठा हादरा बसला. ही घटना गुरूवारी (दि.30) रात्री 11 वाजल्यानंतर घडली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अनिल यास दुसरी मुलगी झाली. त्याची पत्नी बाळंपणासाठी माहेरी गेलेली होती. अनिलचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. आता हे कुटुंब चालवायचे कसे? त्यातच चालूवर्षी अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांची नासाडी झाली. त्यामुळे उत्पन्न न मिळाल्याने व सहकारी संस्थांच्या कर्जाला कंटाळून अनिलने आत्महत्या केल्याची चर्चा दवणगाव परिसरात सुरू आहे.

याप्रकरणी राहुरी पोलिसात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दवणगाव येथील अनिल दिनकर पाळंदे ( वय 47 ) याने गुरुवारी रात्री 11 वाजेनंतर स्वतःच्या आदीरा अनिल पाळंदे ( वय 3 वर्ष ) हिच्या तोंडावर उशी दाबल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अनिल याने घराच्या छताला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

अनिल याच्यावर सहकारी संस्थांचे कर्ज होते. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. शेतीतून उत्पन्न न मिळाल्याने कर्ज कसे फेडायचे? पुढील पिके कशी उभी करायची? या विवंचनेतून त्याने गुरुवारी रात्री 11 वाजेच्यानंतर स्वतःच्या चिमुकल्या मुलीचा खून करून स्वतः आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, हवालदार संजय पठारे, पोलीस शिपाई ठोंबरे आदींसह राहुरी पोलीस ठाण्याचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी पोलीस प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा करून बाप व त्या चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राहुरीला रवाना केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या