मंगळवारपासून बेमुदत उपोषण; राहुरीतील शेतकर्‍यांचा इशारा

jalgaon-digital
2 Min Read

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

जमिनीचे स्थानिक बाजारमूल्य विचारात घेऊन प्रथम मोबदला जाहीर करावा, त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी. अन्यथा राहुरी तालुक्यातील शेतकरी मंगळवार दि. 30 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणासाठी बसणार असल्याचा इशारा शेतकर्‍यांच्यावतीने महसूल प्रशासनाला दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. सुरत, नाशिक, अहमदनगर ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग अधिसूचना 3 (अ) नुसार जमिनी संपादित करण्याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले, सुरत एक्सप्रेस ग्रीनफील्ड अहमदनगर, नाशिक या नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकर्‍यांच्या बागायती व फळझाडे असणारे क्षेत्र संपादित करण्याबाबत अधिसूचना काढण्यात आल्या आहेत. शेतकर्‍यांच्या मालकीच्या जमिनीच्या 7/12 उतार्‍यावर इतर हक्कात सुरत एक्सप्रेस ग्रीन फील्ड अहमदनगर, नाशिक नवीन राष्ट्रीय महामार्ग अधिसूचना 3 (अ) नुसार संपादित क्षेत्र हस्तांतर बंदी, अशी नोंद करण्याबाबत सक्षम भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर यांच्याकडून तलाठी कार्यालयास पत्रव्यवहार झाला आहे.

शेतकर्‍यांना विश्वासात न घेता तसेच शेतकर्‍यांच्या हरकती विचारात न घेता, हुकूमशाही पद्धतीने कार्यवाही करण्यात येत आहे. बागायती जमिनीबाबत राजपत्रात जमिनीच्या नोंदी जिरायती क्षेत्र म्हणून केलेल्या चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यात याव्यात. जमिनीच्या मोबदल्या बाबत जमिनीचे स्थानिक बाजारमूल्य विचारात घेऊन प्रथम मोबदला जाहीर करावा, नंतरच पुढील कार्यवाही करावी. 7/12 उतार्‍यावरील हुकुमशाही पद्धतीने केलेल्या नोंदीबाबत शेतकर्‍यांच्या मालकीच्या जमिनीच्या 7/12 उतार्‍यावर घेतलेल्या हरकतीच्या मुद्यांवर कोणतीही चर्चा न करता 7/12 उतार्‍याच्या इतर हक्कात केलेली महामार्गाची नोंद तात्काळ रद्द करावी. सर्विस रोडबाबत शेतकर्‍यांच्या शेतात जाण्यासाठी सर्व्हिस रोड व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात, आदी मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.

राहुरी तालुक्यातील 19 गावांतील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या हक्कासाठी तसेच त्यांच्या मागण्या सनदशीर मार्गाने मांडण्यासाठी मंगळवार दि. 30 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार असलयाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी वांबोरी, खडांबे खु, खडांबे बु, सडे, डिग्रस, राहुरी बु, राहुरी खु, मोमीन आखाडा, मल्हारवाडी, चिंचविहीरे, वडनेर, तांभेरे, तांदूळनेर, माळेवाडी – डुक्रेवाडी, सोनगाव, धानोरे, नगर आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *