Thursday, April 25, 2024
Homeधुळेशेतात लोंबकळणार्‍या तारांमुळे शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

शेतात लोंबकळणार्‍या तारांमुळे शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

कापडणे । प्रतिनिधी

गव्हाच्या शेतात लोंबकळणार्‍या विद्युत तारांबाबत वेळोवेळी तक्रारी करुनही, महावितरणाने तब्बल चार महिन्यांपासुन दुर्लंक्ष केले आहे. दहा एकर गहू काढणीस आला असतांना या तारांमुळे तो काढायचा कसा असा प्रश्न या शेतकर्‍यासमोर उभा आहे.

- Advertisement -

हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भितीने येथील शेतकरी मच्छिंद्र वसंत पाटील यांनी विद्युत तारांना हात लावुन आत्महत्येचा प्रयत्न केला. जवळच्या शेतकर्‍यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने दुर्घटना टळली.

विज वितरण कंपनीने लोंबकळणार्‍या तारा तात्काळ वरती कराव्यात अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

येथील शेतकरी वसंत देवराम पाटील व मच्छिंद्र पाटील यांनी धनुर शिवारात गव्हाची पेरणी केली आहे. ज्या दहा एकर क्षेत्रात गव्हाची पेरणी केली आहे. त्याच शेतातून जाणार्‍या विद्युत तारा चार महिन्यांपासुन लोंबकळत आहेत.

या तारा जमिनीपासून केवळ तीन- चार फुटावर लोंबकळत आहेत. शेतकरी वसंत पाटील, मच्छिंद्र पाटील, दीपक पाटील आदींनी या तारांबाबत कापडणे महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे वेळोवेळी गार्‍हाणे मांडले. परंतू महावितरण कंपनीने याकडे दुर्लंक्ष केले आहे. शेतकर्‍यांच्या समस्यांकडे दुर्लंक्ष करणार्‍या, महावितरणाच्या या धोरणाला कंटाळून मच्छिंद्र वसंत पाटील या शेतकर्‍याने लोंबकळणार्‍या तारांना हात लावुन आत्महत्येचा प्रयत्न केला. परिसरातील शेतकर्‍यांचे वेळीच लक्ष गेल्याने होणारी दुर्घटना टळली. विज वितरण कंपनीने हे प्रकरण गंभीरतेने घेत तारा वर कराव्यात अशी मागणी होत आहे.

…तर आंदोलन करणार माझ्या गव्हाच्या शेतातील लोंबकळणार्‍या तारांबाबत तक्रारी करुनही तारा वरती होत नाहीत. परिणामी काढणीस आलेला गहू काढता येत नाही. हवेमुळे तारा घासल्या गेल्या तर बर्‍याचदा ठिणग्या उडतात. रात्र-पहाट पाणी भरुन तयार झालेला गहू यामुळे जळुन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातुन वित्त वा जीवित हानी झाल्यास या संभाव्य दुर्घटनेस महावितरण कंपनी जबाबदार राहील. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भितीने हताश झालो व आत्महत्येचा विचार मनात आला.

– मच्छिंद्र वसंत पाटील, शेतकरी, कापडणे

शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरणार सक्तीची वसुली करणार्‍या विज वितरण कंपनीने आपल्या कर्तव्याचीही आठवण ठेवावी. शेतकर्‍यांना मुलभूत सोयी-सुविधा न दिल्यास व शेतकर्‍यांच्या विविध समस्या न सोडवल्यास, शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरुन मोठे आंदोलन उभारले जाईल.

-बापू खलाणे, जि.प.कृषी सभापती

- Advertisment -

ताज्या बातम्या