Friday, April 26, 2024
Homeनाशिकसंतप्त शेतकर्‍यांचा रास्तारोको

संतप्त शेतकर्‍यांचा रास्तारोको

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

खरीप पिकांच्या पोषणासाठी रासायनिक खताची मात्रा देणे गरजेचे असतांना युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासकीय गोदामाबाहेर युरियासाठी शेतकर्‍यांनी रांगा लावल्या होत्या. मात्र युरिया संपल्याचे अधिकार्‍यांतर्फे जाहीर करण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी कॅम्परोडवर रास्तारोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.

- Advertisement -

तहसीलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषि अधिकारी व्यवहारे, पोलीस उपअधिक्षक रमाकांत नवले, कॅम्प पो.नि. पाटील आदी अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकर्‍यांची समजूत काढली. बफर स्टॉकमध्ये असलेल्या युरियाचे जोपर्यंत वाटप सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतल्याने अखेर प्रत्येक शेतकर्‍यास एक गोणी युरियाची देण्याचा निर्णय अधिकार्‍यांनी घेतल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.

निसर्ग वादळासह रोहिणी, मृग व आद्रा नक्षत्रात चांगली पर्जन्यवृष्टी झाल्याने यंदा तालुक्यात खरीप पिके जोमाने आली आहेत. तब्बल ७६ हजार ६३७ हेक्टर क्षेत्रावर ९३.२४ टक्के पेरणी झाली आहे. मका, बाजरी, कापूस, भुईमूग आदी नगदी पिकांना शेतकर्‍यांनी प्राधान्य दिले आहे.आंतर मशागतीचे काम जवळपास अंतीम टप्प्यात असून पिकांची वाढ होत असल्याने रासायनिक खत युरिया पिकांना देणे गरजेचे झाले आहे. असे असतांना बाजारात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासकीय गोदामात २६६ रूपयांना मिळणारा युरिया खाजगी दुकानात ३५० ते ४०० रूपये मोजून देखील मिळत नसल्याने पिक वाचवायचे तरी कसे? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

येथील कॅम्परोडवरील शासकीय गोदामात युरियाचे वाटप केले जात आहे. काळ पहाटे ५ वाजेपासून तालुक्यातील शेतकर्‍यांनी युरियासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र ११ वाजेच्या सुमारास युरिया संपल्याची नोटीस फलकावर लावली गेल्याने शेतकरी संतप्त झाले. याप्रकाराची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश ठाकरे यांनी गोदामावर धाव घेतली. गोदामात युरिया आहे मात्र पहाटेपासून रांगा लावून देखील दिला जात नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. यासंदर्भात ठाकरे यांनी संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारला असता गोदामात बफर स्टॉक असल्याचे सांगण्यात येवून युरिया देण्यास नकार देण्यात आल्याने ठाकरेसह संतप्त शेतकर्‍यांनी कॅम्प रस्त्यावर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केले. अखेर बफर स्टॉकमधील युरिया वाटप करण्याचा अधिकार्‍यांनी निर्णय घेतल्याने संतप्त शेतकर्‍यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

कृषिमंत्र्यांच्या बदनामीचा कट

शेतकर्‍यांना बि-बियाणे तसेच रासायनिक खते मिळावीत यासाठी कृषीमंत्री दादा भुसे संपुर्ण राज्याचा दौरा करत काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई करत आहेत. शेतीच्या बांधावर बि-बियाणे पोहचविण्याचे काम प्रथमच कृषिमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाले. तालुक्यात खतांची कमतरता भासू नये यासाठी दिडपटीने अधिक खतांचा पुरवठा वाढविण्यात आला होता. असे असतांना देखील कृषिमंत्र्यांच्या तालुक्यात खतांसाठी शेतकर्‍यांना रस्त्यावर बसून आंदोलनाची वेळ आली आहे. कृषीमंत्री बदनाम व्हावेत यासाठीच खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेल्याने याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या