Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकआघाडी सरकारकडून शेतकर्‍यांची निराशा : आ. बोरसे

आघाडी सरकारकडून शेतकर्‍यांची निराशा : आ. बोरसे

मुंजवाड । वार्ताहर Munjwad / Satana

बागलाण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे शंभर कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असतांना शासनाने अवघे चार कोटी रुपयांची भरपाई देऊन शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळत त्यांची थट्टा केली असल्याची टिका आ. दिलीप बोरसे यांनी करत राज्य सरकारने खरीप बरोबरच कांदा रोप, द्राक्ष, डाळिंब पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

अतिवृष्टीमुळे हजारो शेतकर्‍यांचे कांदा रोप खराब झाले तर द्राक्ष, डाळिंब पिकांचे सलग दुसर्‍या वर्षी पन्नास कोटीहून अधिक नुकसान झाले. असे असतांना राज्य सरकारने फक्त चार कोटी रुपये इतकी तुटपूंजी भरपाई दिली आहे. वास्तविक गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन 63 कोटी रुपयांची तात्काळ भरपाई दिली होती. यंदा मात्र मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असतांना यंत्रणेला पंचनामे करण्यावर मर्यादा आणल्यामुळेच 90 टक्के नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाईपासून वंचित राहावे लागले असल्याचे आ. बोरसे यांनी निदर्शनास आणून दिले.

लाखो रुपये खर्च करूनही अतिवृष्टीमुळे द्राक्षांची घड जिरून उत्पादन थेट 20 ते 25 टक्क्यांवर आले. डाळिंब पिकाची देखील तीच अवस्था असून काढणीवर आलेले पीक बुरशीच्या प्रादुर्भावमुळे रात्रीतून गळून पडले. त्यामुळे शासनाने सरसकट भरपाई द्यावी जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, अशी मागणी आ. बोरसे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

विरोधकांना मदतीचे कौतुक संतापजनक

बागलाणची काही स्वयंघोषित मंडळी अजून धुंदीतच आहे. जनतेने त्यांना घरी बसवले मात्र ते अजूनही विसरलेच नाही. तुटपुंजी मदत देऊन सरकारने शेतकर्‍यांची अक्षरशः कुचेष्टा केली याबद्दल त्यांना काही घेणे देणे नाही या तुटपुंज्या मदतीबद्दल ते राज्य सरकारचे कौतुक करतात हेच संतापजनक असल्याची टिका आ. बोरसे यांनी विरोधकांवर केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या