यंदा शेतकर्‍यांची दिवाळी रानातच

jalgaon-digital
2 Min Read

खैरी निमगाव |वार्ताहर| Khairi Nimgav

दिवाळी सणाला प्रारंभ होत असताना सतत दोन-तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव येथील शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या पावसाने शेतकर्‍यांनी काढणीला आलेली पिकं विकून दोन-चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, शिवारात उगवलेलं हिरव सोनं आणि शेतकर्‍यांचे स्वप्न अखेर परतीच्या पावसातच वाहून गेले आहे. अशातच जे काही पदरात पडेल ते मिळवण्यासाठी शेतकरी रानातच दिसत आहेत.

आता राज्य सरकार काही निर्णायक पाऊस उचलणार का, हे पहावे लागणार आहे. सणासुदीच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे. यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे दिवाळी तर दुसरीकडे पिकांचे नुकसान, यामुळे बळीराजाच्या हातात आलेले पीक, तोंडचा घास हरवल्याने तो हवालदिल झाला आहे. झालेल्या पिकांचे नुकसान लक्षात घेता, शासनाने तलाठ्यांमार्फत सर्वेक्षण करून ताबडतोब आर्थिक मदत करावी, अशी मागणी असताना देखील शेतकर्‍यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ नसुन सरसकट नुकसान भरपाईची मागणी जोर धरत आहे.

शासनाकडे शेतकर्‍यांचे संपुर्ण रेकाँर्ड असताना आता आम्हाला पळवू नका, असा सुर उमटत आहे. दरम्यान अनेक शेतकर्‍यांकडे स्मार्ट फोन नाहीत तर काहींनी ई-पिकपहाणी केलेली नाही. काहींच जे काही वाचल ते गोळा करण्यासाठी वेळ जातोय. अनेकांच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच राहीला नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त काही शेतकरी शासनाच्या या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शासनाने शेतकर्‍यांना कागदपत्रांसाठी न पळवता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

परतीच्या या पावसाने शेतात असलेल्या उभ्या कपाशी, सोयाबीन, तूर व इतर पिकांबरोबर अनेक फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन तर शेतकर्‍यांच्या घरी येणारच होते, पण या पावसाने या पिकाची सर्वांत जास्त हानी झाली. शेतात पाणी थांबल्यामुळे पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. कर्ज घेऊन शेत पिकवणारे शेतकरी विमा कसा उतरवणार मग अशावेळी मायबाप सरकार कडून मदतीची अपेक्षा केल्याखेरीज पर्याय नसतो. अशावेळी कागदपत्रांसाठी शेतकर्‍यांना न पळवता सरसकट आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *