Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदुहेरी संकटाने उत्पादक हवालदिल

दुहेरी संकटाने उत्पादक हवालदिल

अंबासन । Ambasan प्रशांत भामरे

कांद्याच्या दरात सतत होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. 400 ते 800 रूपये दरम्यान प्रतिक्विंटल दराने कांद्यास भाव मिळत आहे. चांगल्या भावाच्या प्रतिक्षेत चाळीत चार ते पाच महिन्यांपासून साठवलेला कांदा आता सडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांदा सडून फेकण्यापेक्षा मिळेल तो भाव पदरी पाडून घेण्याकडे उत्पादकांचा कल वाढला आहे.

- Advertisement -

दुष्काळ, अतीवृष्टीनंतर यंदा करोना प्रादुर्भावाचा फटका कांदा उत्पादकांना बसला आहे. कवडीमोल किंमतीत कांदा विकण्याची वेळ आली असल्याने कर्जाचा बोजा अधिक वाढणार आहे. त्यामुळे शासनानेच 1800 ते 2 हजार रूपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करावा, अशी अपेक्षा उत्पादकांतर्फे व्यक्त केली जात आहे.

करोना उद्रेकामुळे लॉकडाऊन काळात मुंगसेसह उमराणे, लासलगाव, पिंपळगाव आदी बाजार समित्या बंद होत्या. नंतर समित्यांचे कामकाज सुरू झाले व्यापार्‍यांसह समिती घटक पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने समित्यांचे कामकाज बंद ठेवले जात आहे. याचा थेट फटका शेतमाल विक्रीवर पडत आहे.

लॉकडाऊन तसेच भाव नसल्यामुळे शेतकर्‍यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. सर्वत्र लिलाव सुरू झाल्यास कांद्यास चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा असल्याने चाळीतील साठवलेला कांदा तळहातावरील फोड्याप्रमाणे शेतकर्‍यांनी जपला होता.

मात्र भावात होत नसलेली सुधारणा तसेच करोनामुळे बंद राहत असलेले लिलाव उत्पादकांच्या चिंतेत अधिक भर घालत आहे. चार ते पाच महिन्यांपासून कांदा चाळीत असल्याने वजनात फरक पडण्याबरोबर तो आता सडू देखील लागला आहे.

वादळी पावसामुळे देखील कांदा सडण्याचे प्रमाण अधिक वाढल्याने चाळीतील सडलेला कांदा काढण्यासाठी अतिरिक्त खर्च करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. त्यामुळे सध्या मिळत असलेल्या भावात उत्पादन खर्च निघणे देखील अवघड झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

करोना उद्रेकामुळे शासन-लोकप्रतिनिधींचे शेतकर्‍यांच्या व्यथेकडे अद्याप लक्ष गेलेले नाही. सत्ताधारी असो की विरोधक त्यांचे प्रेम हे फक्त निवडणूक काळातच उफाळून येते अशी संतप्त प्रतिक्रिया कांदा उत्पादकांतर्फे व्यक्त केली जात आहे. कांदा सडून फेकण्यापेक्षा जो भाव मिळेल त्या भावात विकून मोकळे होणे एवढाच पर्याय शिल्लक आहे.

मात्र यामुळे कर्जाचा बोजा अधिक वाढणार असल्याने शासनाने या संकटातून बाहेर काढण्यासाठी किमान 2 हजार रूपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करत दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकर्‍यांतर्फे केली जात आहे.

अनुदानाद्वारेे दिलासा मिळावा

गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. मात्र करोना उद्रेकाचा फटका विक्रीवर झाला. देशात एका महिन्यास 7 लाख मेट्रीक टन लागत असतांना बाजार समित्या बंद राहत असल्याने फक्त 3 लाख टनाची विक्री होत आहे.

तसेच भावाच्या प्रतिक्षेत चाळीत साठवलेला कांदा वातावरणामुळे सडत असल्याने शेतकर्‍यांचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी विक्री झालेल्या कांद्यास शासनाने 500 रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे अनुदान जाहीर करावे, अशी अपेक्षा प्रगतशील शेतकरी संतोष पगार यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या