Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमालेगाव तालुका वार्तापत्र : अवकाळीने शेतकर्‍यांची चिंता वाढली

मालेगाव तालुका वार्तापत्र : अवकाळीने शेतकर्‍यांची चिंता वाढली

मालेगाव । हेमंत शुक्ला | Malegaon

सलग तिसर्‍या वर्षी देखील अवकाळी पाऊस (Untimely rain) व रोगट हवामानाच्या (Sick weather) संकटाने पिच्छा न सोडल्याने मालेगावसह (malegaon) बागलाण (baglan), देवळा (deola) तालुक्यातील शेतकरी (farmers) अक्षरश: हताश झाले आहेत. करोना (corona), वादळ, अतीवृष्टी (heavy rain), रोगराई या संकटांचा सामना करीत पुन्हा उभारी घेण्यासाठी सज्ज झालेल्या शेतकर्‍यांच्या आशा आकांक्षा अवकाळी पावसासह रोगट हवामानाने धुळीस मिळविल्या आहे.

- Advertisement -

हजारो हेक्टरवरील द्राक्ष-डाळींब बागा, लाल-उन्हाळी कांदा, शेवगा, टोमॅटो व भाजीपाला (Vegetables) आदी पिकांची संततधार धरलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: वाताहत करून टाकली आहे. आर्थिक आधार देणार्‍या पिकांचे डोळ्यादेखत होत असलेले नुकसान हताशपणे पाहण्याची आलेली वेळ शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रू तराळणारी ठरली. शेतमालाच्या झालेल्या नुकसानीची समोर आलेली आकडेवारी शेतकर्‍यांवर ओढवलेल्या आर्थिक संकटाची भिषणत: दर्शविणारी ठरत आहे.

सलग तीन वर्षापासून मालेगाव, बागलाण व देवळा तालुक्यातील शेतकरी अवकाळी संकटाच्या चक्रव्युहात अडकले आहेत. अतीवृष्टी (heavy rain) व परतीच्या पावसाने तडाखा देत खरीप हंगामाची (kharip season) वाताहत करून टाकली तर तेल्या रोगाने पुन्हा डाळींब बागांना तडाखा दिला आहे. मात्र या संकटातून सावरत शेतकर्‍यांनी हिंमतीने रब्बी हंगामाची तयारी केली होती. चांगल्या पावसामुळे अर्ली द्राक्षाच्या बागा (Grapes farming) देखील बहरल्या होत्या. यंदा द्राक्ष व डाळींबाला चांगला भाव मिळत असल्याने झालेले नुकसान भरघोस उत्पादनामुळे भरून निघेल अशी स्वप्ने शेतकरी पाहत होते.

मात्र तीव्र गारठ्यासह दोन दिवस संततधार कोसळत असलेल्या अवकाळी पाऊस व दव निर्माण करणार्‍या दाट धुक्यामुळे द्राक्ष, डाळींब बागांसह उन्हाळ-लाल कांदा, शेवगा, टोमॅटो, फ्लॉवर, मेथी, कोथंबीर, पालक आदी नगदी पिक समजल्या जाणार्‍या शेतमालाची पुर्णत: हानी झाल्याने शेतकर्‍यांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे. लगडलेल्या अर्ली द्राक्ष बागांचे झालेले नुकसान दोनशे कोटींच्या वर असल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसून येत आहे. लाल कांदा (onion) व उन्हाळ कांदा रोपांची हानी देखील शेकडो कोटींच्या घरातच आहे. डाळींब, शेवगा, टोमॅटो आदी पिकांची हानी देखील यापेक्षा वेगळी नाही. सलग तिसर्‍या वर्षी देखील अवकाळीने आणलेली ही आर्थिक अवकळा आता निस्तरायची तरी कशी? असा यक्ष प्रश्न आपद्ग्रस्त शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे.

जिल्ह्यात मिनी द्राक्ष पंढरी म्हणून नावारूपास आलेल्या बागलाण तालुक्यातील करंजाड, पिंगळवाडे, मुंगसे, लाडूद, भुयाणे, निताणे, जायखेडा, ब्राम्हणपाडे, भडाणे, बिजोटे, खिरमाणी, कुपखेडा, ब्राम्हणगाव, तळवाडे दिगर, दसाणे, किकवारी, डांगसौंदाणे, ताहाराबाद, अंबासन आदी परिसरातील सुमारे दिड हजारावर हेक्टर क्षेत्रावरील अर्ली द्राक्ष बागांची अवकाळी पावसाने वाताहत करून टाकली आहे. काढणीवर आल्यामुळे व्यापार्‍यांशी सौदे झालेल्या द्राक्षांना संततधारेमुळे पाणी उतरल्याने तडे गेले आहेत.

यामुळे शंभर रूपये किलोने जाणारे हे द्राक्ष आता व्यापार्‍यांनी सौदे नाकारल्याने कवडीमोल किंमतीत विकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. फक्त बागलाणातच सुमारे शंभर कोटीच्या वर नुकसान द्राक्ष उत्पादकांचे झाले आहे. अशीच परिस्थिती मालेगाव-देवळा तालुक्यातील दाभाडी, आघार, चिंचावड, पाटणे, जळगाव गा., येसगाव, मथुरपाडे, गिलाणे, ज्वार्डी आदी परिसरात द्राक्ष उत्पादकांची देखील झाली आहे. द्राक्ष विकण्याची वेळ आल्यावर अवकाळीने होत्याचे नव्हते करून टाकले आहे. या द्राक्षांना व्यापारी सोडाच परंतू बेदाणा उत्पादक देखील विकत घेत नसल्याने ते फेकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही अशी व्यथा अनेक द्राक्ष उत्पादकांनी बोलून दाखवली.

हिंमतीलाच किंमत असते याचा प्रत्यक्ष अनुभव उत्पादकांना मिळाल्याने अर्ली द्राक्ष बागेच्या क्षेत्रात वाढ झाली. धोका पत्करून अर्ली द्राक्षाचे उत्पादन शेतकरी घेतात. उत्पादन कमी असले तरी उत्पन्न मात्र चांगले मिळत असल्यामुळे अर्ली द्राक्षाच्या लागवडीस शेतकर्‍यांनी पसंती दिली आहे. एक एकर द्राक्ष बागेस लावणी ते छाटणीपर्यंत सर्व खर्च मिळून सुमारे अडीच ते तीन लाखाचा खर्च येतो. मात्र अर्ली द्राक्ष निर्यात होत असल्यामुळे शंभर रूपये किलोपर्यंत भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च जावून लाख-दोन लाखाची शिल्लक हातात राहत असल्याने उत्पादकांना दिलासा होता.

मात्र अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांचे गेल्या तीन वर्षापासून अर्थचक्र पुर्णत: विस्कळीत करून टाकले आहे. काढणीच्या वेळेसच अवकाळी येत असल्यामुळे द्राक्षांना तडे जावून ते कवडीमोल ठरत आहे. जाचक अटी-शर्तीमुळे अर्ली द्राक्षांचा पिकविमा कुणी काढत नाही. तसेच शासनाकडून नुकसान भरपाई देखील मिळत नाही. त्यामुळे शंभर टक्के नुकसान पदरी पडत असल्याने उत्पादक हताश झाले आहेत. तीन वर्षापासून सतत होत असलेल्या या नुकसानीमुळे द्राक्ष बागा तोडण्याच्या मनस्थितीत आलो असल्याची खंत अनेक शेतकर्‍यांनी बोलून दाखवली.

डाळींब, आंबा, कांदे आदी पिकांना शासनाच्या विविध योजनांचा तसेच अनुदानाचा लाभ मिळतो. मात्र आम्हाला अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले असल्याची व्यथा द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केली आहे. आम्ही रिस्क घेवून उत्पादन घेतो. मात्र आजमितीस औषधे, साहित्य, डिझेल आदींच्या वाढलेल्या किंमतीमुळे उत्पादन खर्च भरमसाठ वाढला आहे. मंडलनिहाय होणार्‍या पर्जन्य मापकाच्या तांत्रिक चुकीचा देखील फटका शेतकर्‍यांना बसू लागला आहे. पाऊस पडून देखील पर्जन्य मापकात नोंद झाली नसल्याने शेतकर्‍यांना भरपाईपासून वंचित राहावे लागते.

ही पध्दत बदलण्याबरोबर शासनाने फवारणी औषधांवरील जीएसटी कर माफ केला पाहिजे. तसेच पॉलीपेपरसाठी अनुदान दिल्यास तो मोठा आधार ठरणार आहे. शासनाकडून कधीतरी मिळत असलेल्या नुकसान भरपाईने औषधांवरील जीएसटी कर सोडा, मजुरीचा खर्च देखील निघत नाही. त्यामुळे अर्ली द्राक्षांसाठी शासनाने आपल्या धोरणात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत उत्पादकांनी व्यक्त केले. सलग तीन वर्षापासून अवकाळीमुळे आर्थिक उभे ठाकत आहे. यामुळे यंदा तरी भरपाई देत शासनाने दिलासा द्यावा, अशी अपेक्षा उत्पादक बाळगून आहेत.

अवकाळी पाऊस व गारठ्यामुळे द्राक्षाबरोबर लाल-उन्हाळ कांद्याचे झालेले नुकसान मालेगावसह बागलाण, देवळा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या चिंतेत भर घालणारे ठरले आहे. लाल कांदा काढणीच्या व उन्हाळ कांदा लागवडीच्या हंगामात अवकाळीसह रोगराईचे आक्रमण झाल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेकडो कोटी रूपयांच्या कांद्याचे नुकसान झाले आहे. काढणीवर आलेला लाल कांदा तसेच लागवडीसाठी तयार असलेली रोपांची हानी पावसाने झाली आहे. उरले सुरलेले पिक व रोपे करपा रोगाच्या तडाख्याने वाया जाण्यातच जमा आहे.

अवकाळीने कांदा-रोपे भिजलीच परंतू स्वप्ने देखील वाहून नेली असल्याने कादा उत्पादक हवालदिल झाले आहेत. अशीच अवस्था नगदी पिक शेवगा, टोमॅटो आदी पिकांची अवकाळीमुळे झाली असल्याने शेतकरी पुर्णत: हतबल झाले आहेत. अवकाळीमुळे द्राक्ष, डाळींबसह लाल-उन्हाळ कांदा, शेवगा, टोमॅटो आदी शेतमालाची पुर्णत: हानी झाली आहे. त्यामुळे पंचनाम्याचे सोपास्कार तातडीने पुर्ण करत शासनाने आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आवश्यकता आहे. या मदतीमुळेच त्यांना पुन्हा सक्रिय होता येणार आहे. ही वस्तुस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज येवून ठेपली आहे.

संकटाने मेंढपाळ हवालदिल

अवकाळी पावसाचा तडाख्याने सलग तिसर्‍या वर्षी देखील मेंढपाळांना हवालदिल केले आहे. मालेगाव, बागलाण व देवळा तालुक्यात सुमारे हजारावर जनावरांचा पावसासह गारठ्याने झालेला मृत्यू पशुपालकांना चिंताग्रस्त करणारा ठरला आहे. शेतात उघड्यावर असल्यामुळे तीव्र गारठ्यासह पावसात भिजल्यने सातशेच्या वर मेंढ्यांच्या झालेल्या मृत्यूने मेंढपाळांवर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. केस ‘लोकर’ कातरणीचा हंगाम सुरू असल्याने बहुतांश मेंढ्यांच्या अंगावर ऊब देणारे लोकर कापण्यात आले होते.

त्यामुळे पाऊस व गारठ्याचा तडाखा सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मेंढपाळांबरोबर काही शेतकर्‍यांचे देखील मेंढ्या उपजिविकेचे साधन बनले होते. अवकाळीने या साधनावरच झडप घातल्याने त्यांच्यात निराशा पसरली आहे. हिंस्त्र प्राण्याने जनावरे मारल्यास शासनातर्फे भरपाई दिली जाते. मात्र अवकाळी पावसाने मेंढ्या मृत्यूमुखी पडल्यास भरपाई मिळत नाही अशी खंत मेंढपाळांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या