समृद्धी महामार्ग विरोधात शेतकरी आक्रमक

jalgaon-digital
3 Min Read

सिन्नर । वार्ताहर Sinnar

समृद्धी महामार्गालगत ( Samruddhi Express Highway ) शेतकर्‍यांच्या वाहनांची ये-जा करण्यासाठी 10 फूट लांबीचा सर्व्हिस रोड द्यावा, नादुरूस्त रस्ते वाहतूक योग्य करून देण्याबरोबरच समृद्धीसाठी खोदलेल्या खाणींना तार कंपाऊंड करून द्यावे या मागणीसाठी वावी-सायाळे रस्त्यावरील दुशिंगपूर शिवारातील समृद्धीच्या पुलाखाली शेतकर्‍यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला. मात्र तहसीलदार राहुल कोताडे (Tehsildar Rahul Kotade )यांनी उपोषकर्त्यांची भेट घेऊन मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे उपोषण तूर्तास मागे घेण्यात आले.

तहसील कार्यालयात एम. एस. आर.डी.सी.च्या अधिकार्‍यांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदार राहुल कोताडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महिनाभराच्या आत नादुरूस्त रस्ते वाहतूक योग्य करून देण्याबरोबरच समृद्धीसाठी खोदलेल्या खाणींना तार कंपाऊंड करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी महिनाभराची मुदत मागून घेतली होती. मात्र या मुदतीत एकही आश्वासन न पाळल्याने डॉ. विजय शिंदे, दत्तात्रय कहांडळ, अंकुश पवार, दत्ता पवार, कचरू कहांडळ, भास्कर कहांडळ, कानिफनाथ काळे, नितीन अत्रे, रावसाहेब अत्रे, संपत काळे यांच्यासह सायाळे, मलढोण, दुशिंगपूर, कहांडळवाडी, फुलेनगर येथील शेतकर्‍यांनी वावी-सायाळे रस्त्यादरम्यान दुशिंगपूर शिवारात समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली आमरण उपोषणास प्रारंभ केला.

समृद्धी महामार्गामुळे अनेक शेतकर्‍यांंच्या जमिनीचे तुकडे झाले आहेत. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. समृद्धी महामार्गालगत भिंती टाकण्यात आल्याने शेतकर्‍यांना शेतातून घराकडे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे समृद्धी महामार्गालगत 10 फुटी सर्व्हिस रोड देण्यात यावा या मागणीसाठी हे शेतकरी आक्रमक झाले आहेत. समृद्धी महामार्गाच्या कामासाठी डीबीएल कंपनीने मोठ्या प्रमाणात उत्खनन केले आहे. उत्खनन केलेल्या खाणींना तार कंपाऊंड किंवा मार्गदर्शक सूचना फलक लावलेले नसल्याने अनेक अपघात घडून त्यात निरपराध लोक बळी पडले आहेत.

महामार्गासाठी आवश्यक असलेले माती, मुरूम आणि इतर साहित्य वाहून आणण्यासाठी कंपनीच्या अवजड वाहनांचा वापर करण्यात आला. त्यामुळे पूर्व भागातील संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली असून हे रस्ते वाहतुकीस अयोग्य बनले आहेत. शिवाय शेतकर्‍यांचे शिवार रस्ते हे समृद्धी महामार्गामुळे बंद करण्यात आले असून परिसरातील दळणवळण त्यामुळे ठप्प झाले आहे. त्यामुळे विजय शिंदे, भास्कर कहांडळ यांच्यासह पूर्व भागातील काही शेतकर्‍यांनी हे आंदोलन सुरू करत प्रशासनाचे लक्ष वेधले. तहसीलदार राहुल कोताडे, एमएसआरडीसीचे अधिकारी निंबादास बोरसे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

समृद्धी महामार्गाच्या कडेला सर्व्हिसरोडचा प्रश्न हा संपूर्ण राज्यभर असून तो स्थानिक पातळीवर सोडवणे अवघड असल्याचे अधिकार्‍यांनी उपोषणकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यासंदर्भात सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे शेतकर्‍यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदनाची दखल न घेतल्यास ज्या दिवशी समृद्धी महामार्ग सुरू होईल त्या दिवशी या मार्गावर उपोषण करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला. हे निवेदन तातडीने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले. आंदोलनकर्त्यांच्या इतर मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *