Friday, April 26, 2024
Homeजळगाववाळू माफियांकडून शेतकर्‍याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

वाळू माफियांकडून शेतकर्‍याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात वाळू माफियांची (sand mafia) दहशत चांगलीच वाढली आहे. वाळू उपशाला विरोध करणार्‍यांना धमकावुन त्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल पोहोचली आहे. शुक्रवारी आव्हाणे शिवारातील नदी पात्रात असाच प्रकार घडला. वाळू उपसा करण्याला विरोध केला म्हणून वाळू माफियांनी एका शेतकर्याला (Farmer) अक्षरश: बेशुध्द होईपर्यंत मारहाण (beaten) केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर ग्रामस्थ (Villagers) आणि पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent Police) यांच्यात कारवाई करण्यावरून जोरदार शाब्दीक वाद झाला.

- Advertisement -

जिल्ह्यात वाळू चोरांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातील वाळू ठेके बंद असल्याने चोरी हा एकमेव मार्ग माफियांकडुन अवलंबिला जात आहे. आज घडलेल्या घटनेची माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील मनोहर रूपसिंग चौधरी यांचे गिरणा नदी पात्रालगत शेत आहे. नदी पात्रातून वाळू उत्खनन केल्यानंतर वाळूने भरलेले ट्रॅक्टर व डंपर त्यांच्या शेतातून नेले जात होते. शेतात रस्ता तयार होत असल्याने मनोहर चौधरी यांनी वाळू माफियांना विरोध केला. त्याचा राग आल्याने वाळूमाफियांनी चौधरी यांना जबर मारहाण केली. मारहाणीत चौधरी हे बेशुद्ध झाले.

ग्रामस्थ येताच वाळू माफिया पसार

मनोहर चौधरी यांना झालेल्या मारहाणीचा प्रकार आजूबाजूच्या शेतकर्‍यांच्या लक्षात आल्यानंतर, शेतकर्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ग्रामस्थ येत असल्याचे लक्षात येताच मारहाण करणार्‍या माफियांनी तेथेच आपले ट्रॅक्टर सोडून पळ काढला. थोड्याच वेळात शेतकर्‍याच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी नदीपात्रात दाखल झाले.

पोलिसांवर व्यक्त केला संताप

घटनेची माहिती मिळताच नदीपात्रात पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा व तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुंभार हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, डीवायएसपी कुमार चींथा यांनी ग्रामस्थांना ‘तुमची नाटक बंद करा’ अशी भाषा वापरल्याने ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनात विरोधात जोरदार शाब्दीक वाद झाला.

ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा

मारहाणीच्या घटनेनंतर वाळू माफियांनी ट्रॅक्टर नदीपात्रात सोडुन पलायन केले. दरम्यान याप्रकरणी मनोहर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस प्रशासनाने दोन ट्रॅक्टर जप्त केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या